खानपूर (उत्तराखंड) – उत्तराखंडच्या खानपूर मतदारसंघातील भाजप आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांची पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रणव सिंह चॅम्पियन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये प्रणव सिंह चॅम्पियन दारुच्या नशेत बंदुका घेऊन डान्स करताना दिसून आले.
प्रणव सिंह चॅम्पियन यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ते आपल्या हातात बंदुका घेऊन दारुच्या नशेत डान्स करत होते.
प्रणव सिंह चॅम्पियन यांनी आपल्या काही समर्थकांसोबत पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी ते एका गाण्यावर एका हातात दारुचे ग्लास आणि एका हातात 4-4 बंदुका घेऊन डान्स करत असल्याचे त्या व्हिडिओत स्पष्ट दिसत होते. त्यांच्या या पार्टीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने त्यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका करण्यात येत होती.
दरम्यान, प्रणव सिंह चॅम्पियन यांचा यापुर्वीही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देताना प्रणव सिंह चॅम्पियन दिसून आले होते. याप्रकरणी पत्रकाराकडून दिल्लीतील चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात प्रणव सिंह चॅम्पियन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पक्षाने प्रणव सिंह चॅम्पियन यांच्यावर जूनमध्ये तीन महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई केली होती.