जनावरांना पाणी न मिळाल्याने शेतकऱ्याचा गेला जीव

कुकुडवाड येथील हृदयद्रावक घटना
गोंदवले, दि. 4 (प्रतिनिधी) – माण तालुका सध्या भयानक दुष्काळाला सामोरे जात असून पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष जाणवत आहे. कुकुडवाड, ता. माण येथे जनावरांची पिण्याच्या पाण्या वाचून होणारी तगमग पाहून विष्णू आप्पा धनवडे या शेतकऱ्याला मानसिक धक्का बसून या त्रासाने हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या घटनेत धनवडे यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने परिसरातील ग्रामस्थांमधून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कुकुडवाड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात धनवडेवाडी हे छोटंसं गाव आहे. या छोट्याशा वाडीसाठी टॅंकरने पाणी पुरवठा सुरू होता. या वाडीच्या परिसरात कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने नागरिक पूर्णपणे टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शासनाने मानसी 20 लिटर पाणी देण्याचे आदेशानुसार पाण्याचे वाटप होत आहे. त्यातूनही टॅंकर वेळेवर येत नसल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही तर जनावरांना पाणी पाजणे परिणामी कठीण झाले आहे.
गुरुवारी विष्णू धनवडे यांच्या जनावरांना दोन दिवस तहान भागण्याइतके पाणी मिळाले नव्हते. ते त्यांना पाहवले नव्हते म्हणून ते सायकलवरून पाणी मागण्यासाठी कुकुडवाड ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. त्या ठिकाणी पाणी मिळण्याबाबत चर्चा करून घराकडे परत जात असताना जनावरांच्या काळजीने त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला व ते सायकलवरून रस्त्यावर कोसळले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)