उत्तरप्रदेशात करोना फैलाव रोखण्याचा योगींचा प्रयोग फसला

लखनौ – उत्तरप्रदेशातील सत्तारूढ भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोकरशाहीच्या माध्यमातून करोना फैलाव रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयोग फसला, अशी परखड भूमिका सिंह यांनी मांडली.

उत्तरप्रदेशात भाजपचे मंत्री आणि आमदारांनाच करोनाची लागण होत आहे. उपचाराअभावी त्यातील काहींना प्राण गमवावे लागले. ती बाब व्यवस्थेतील त्रुटीच मानली जायला हवी. व्यवस्था नोकरशाही केंद्रित नसावी. व्यवस्थेच्या केंद्रस्थानी लोकनियुक्त प्रतिनिधी असावेत, असे सिंह बलियामध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले. करोनास्थिती हाताळण्यात योगी सरकारला अपयश आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच सिंह यांचे वक्‍तव्य राज्य सरकार आणि भाजपची गोची करणारे ठरू शकते.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उत्तरप्रदेशातील स्थिती चिंताजनक बनली आहे. त्या राज्यात शुक्रवारी तब्बल 34 हजार 626 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्याशिवाय, 332 करोनाबाधित दगावले. करोनामृतांचा तो उत्तरप्रदेशातील एकाच दिवसातील आजवरचा उच्चांक ठरला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.