World Adivasi Day: राजगुरुनगरमध्ये ‘आदिवासी भवन’ उभारणार! आमदार बाबाजी काळे यांची मोठी घोषणा
World Adivasi Day: राजगुरुनगर येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा; आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून महापुरुषांना अभिवादन.

World Adivasi Day – आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वपक्षीय स्तरावर प्रयत्न केले जातील,” अशी ग्वाही खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी दिली. खेड तालुका आदिवासी उत्सव समितीच्या वतीने राजगुरुनगर येथील चंद्रमा मंगल कार्यालयात रविवारी (दि. ९) ‘जागतिक आदिवासी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्यासह विविध महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सर्जन डॉ. दिलीप बांबळे होते. प्रमुख वक्ते शिवव्याख्याते संपत गारगोटे म्हणाले, “आदिवासी समाजाने प्रगतीसाठी शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. बिरसा मुंडा यांच्या बलिदानामुळेच आज सातबारा उताऱ्यावर आदिवासी बांधवांची नावे लागली आहेत.
त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी केंद्र सरकारने बिरसा मुंडा यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे.” तसेच त्यांनी जागतिक आदिवासी दिनादिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली. यावेळी ॲड. विजयसिंह शिंदे व एकनाथ तळपे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक बाजार समितीचे संचालक विठ्ठल वनघरे यांनी केले. सूत्रसंचालन कैलास मुसळे यांनी केले आभार राहुल आढारी यांनी मानले.
प्रमुख पाहुणे म्हणून खेडचे आमदार बाबाजी काळे, व्याख्याते साहित्यिक संपत गारगोटे, शिवसेना जिल्हा परिषदेचे गटनेते ॲड. विजयसिंह शिंदे, डॉ. प्रमिला बांबळे, जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे, पंचायत समिती सदस्य दिनेश हांडे, मनिषा हिले, सुजाता पचपिंड, साहित्यिक कृष्णकांत भोजने यांच्यासह आदिवासी उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजगुरुनगरमध्ये ‘आदिवासी भवन’ उभारणार
आमदार बाबाजी काळे म्हणाले, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. राजगुरुनगर येथे ‘आदिवासी भवन’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल,
तसेच क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय भोरगिरी ते भीमाशंकर रस्त्याचा प्रश्न आणि स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल.






