Babaji Kale: ‘नागरिकांना बेघर करण्याचा अधिकार नाही!’ आमदार बाबाजी काळे यांचा प्रशासनाला इशारा
Babaji Kale: राजगुरुनगर येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात; प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याचे आमदारांचे निर्देश.

Babaji Kale – तालुक्यातील सामाजिक व सार्वजनिक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. अधिकार्यांनी जनतेची कामे करावीत. नागरीकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी राजगुरुनगर येथे केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून खेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज तालुकास्तरीय महाराजस्व समाधान शिबिर’
येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात आमदार बाबाजी काळे बोलत होते. उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे म्हणाले, शासनाने नागरिकांसाठी विविध योजना आणल्या आहेत. त्याचा जास्तीत जास्त लाभ खेड तालुक्यातील नागरिकांना देण्यासाठी प्रशासन पुढे आहे. त्यासाठी सर्व विभाग काम करीत आहेत. नागरिकांच्या सूचना प्रश्न लक्षात घेऊ लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधून तालुक्यातील प्रश्न समस्या सोडवण्यात येत आहेत.
या समाधान शिबिरात आमदार बाबाजी काळे यांनी तालुक्यातील महत्वाचे चार प्रश्न शेतकरी, नागरिकांना सतावत असल्याचे नमूद केले. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी जमिनी संपादित झाल्या असतानाही केंद्राच्या धोरणांमुळे पुन्हा भूसंपादनाचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून हा घोळ त्वरित मिटला पाहिजे. भामा आसखेड, चासकमान आणि कळमोडी धरणग्रस्तांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत.
ज्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, त्यांच्या संपादित जमिनी परत मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू असून प्रशासनाने पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत. ज्या गावकऱ्यांनी गायरान जमिनी संरक्षित केल्या, त्यांनाच या जमिनींचा लाभ दिला जात नाही. ग्रामसभा घेऊन गायरान जमिनींचे योग्य आराखडे तयार करावेत आणि बेघरांना निवाऱ्यासाठी या जमिनीचा वापर करण्याची परवानगी द्यावी.
गोळेगाव व खराबवाडी येथे गायरान जागेवरील अतिक्रमणे हटवल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. शासनाला कोणालाही बेघर करण्याचा अधिकार नाही. खराबवाडी येथे गावासाठी दिलेल्या ४ एकर गायरान जमिनीचा महसूल अधिकाऱ्यांनी शोध घेऊन कारवाई थांबवावी. अन्यथा भविष्यात प्रशासन आणि जनतेत मोठा संघर्ष उद्भवू शकतो, असा इशारा त्यांनी दिला.





