Saswad News: खानवडीतील महात्मा फुले स्मारकाबाबत वाद! ४ कोटींचे नवे बांधकाम, पण जुन्या सभागृहावर हातोडा?
Saswad News: महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मूळ गावी वाडा इमारतीचे नवे बांधकाम; जुन्या इमारतींच्या पाडकामाच्या परवानग्यांवरून चर्चा रंगली.

Saswad News- महात्मा ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव असलेल्या खानवडी (ता. पुरंदर) येथे प्रस्तावित महात्मा फुले स्मारकाच्या नव्या बांधकामाचा विषय चर्चेत आला आहे. जिल्हा परिषद पुणे बांधकाम विभागाच्या कार्यारंभ आदेशानुसार स्मारकाच्या वाडा इमारतीच्या बांधकामासाठी 4 कोटी 1 लाख 41 हजार 667 रुपयांची निविदा स्वीकृत करण्यात आली असून, काम पूर्ण करण्यासाठी 300 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
मात्र, या नव्या बांधकामासाठी विद्यमान स्मारक परिसरातील काही बांधकामे व काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले सभागृह पाडले जाणार असल्याची चर्चा असल्याने ग्रामस्थांकडून त्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिल्हा परिषद पुणे बांधकाम विभागाने 9 सप्टेंबर 2026 रोजी दिलेल्या कार्यारंभ आदेशानुसार मे. कोहिनूर कन्स्ट्रक्शन यांना मौजे खानवडी येथील महात्मा ज्योतिराव फुले स्मारकाच्या वाडा इमारतीच्या बांधकामाचे काम देण्यात आले आहे.
आदेशातील अंदाजपत्रकीय रक्कम 4 कोटी 1 लाख 45 हजार 682 रुपये, तर स्वीकृत निविदा रक्कम 4 कोटी 1 लाख 41 हजार 667 रुपये आहे. कामाचा कालावधी 9 सप्टेंबर 2026 ते 6 जुलै 2027 असा 300 दिवसांचा आहे. खानवडी येथील महात्मा फुले स्मारक परिसरात यापूर्वी शासनाच्या निधीतून सभामंडप अथवा सभागृह उभारण्यात आले आहे. हे बांधकाम काही वर्षांपूर्वीच करण्यात आले असताना नव्या स्मारकाच्या कामासाठी ते पाडण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे अद्याप वापरण्यायोग्य असलेले बांधकाम पाडून पुन्हा नव्याने बांधकाम करण्यामागील कारण काय, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. जुन्या जिल्हा परिषद शाळांच्या इमारती पाडण्यासाठी विविध परवानग्यांचा प्रश्न उपस्थित होत असताना काही वर्षांपूर्वी उभारलेल्या सभागृहाच्या पाडकामास परवानगी देण्यात आली आहे का, याबाबतही संबंधित यंत्रणेने स्पष्टता द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.





