Bhimashankar News: भीमाशंकरला चाललाय? आधी ही बातमी वाचा; ‘या’ प्रसिद्ध धबधब्यावर पर्यटकांना बंदी
Bhimashankar News: भीमाशंकर अभयारण्यातील सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाचा मोठा निर्णय; सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांची माहिती.

Bhimashankar News – आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्य परिसरातील कोंढवळ येथील निसर्गरम्य धबधबा सध्या पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. सद्यस्थितीत धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून, त्याचे मनमोहक रूप पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देत आहेत. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हा धबधबा असल्याने दर्शनासाठी येणारे भाविकही या ठिकाणी आवर्जून भेट देत आहेत.
घनदाट जंगल,हिरवाईने नटलेला परिसर,धुक्याची चादर आणि खळाळून वाहणारा धबधबा यामुळे येथील वातावरण पर्यटकांना भुरळ घालत आहे. भीमाशंकर अभयारण्यातील जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठीही अनेक निसर्गप्रेमी येथे येत आहेत. शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी पर्यटकांची विशेष गर्दी होत असून, स्थानिकांच्या लहान-मोठ्या व्यवसायांनाही त्याचा लाभ होत आहे.
मात्र, धबधब्याजवळ पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेला कोंढवळ धबधबा हा पावसाळी पर्यटनाचा अविस्मरणीय अनुभव देणारे ठिकाण म्हणून दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय ठरत आहे.
“कोंढवळ धबधबा, नागफणी पॉईंट, कोकणकडा तसेच इतर धोका ग्रस्त ठिकाणी पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याचे पत्रक भीमाशंकर अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ६ जुलै रोजी जारी केले आहे.”
– सागर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडेगाव.





