Bhor News: १४१ वर्षांचा भरभक्कम इतिहास ठरतोय अडसर? इंग्रजकालीन ऐतिहासिक दगडी पुलावर चालणार हातोडा
Bhor News: कोणताही धोका नसताना केवळ तांत्रिक कारणास्तव पूल हटवण्यास इतिहासप्रेमींचा तीव्र विरोध; पर्यायी मार्गाची मागणी.

Bhor News- भोर- शिरवळ या मार्गावर भोर व उत्रौलीच्या दरम्यान रामबाग येथील ओढ्यावर वाहतुकीसाठी इंग्रजांनी दगडी पूल बांधला होता. या पुलाला १४१ वर्षे पूर्ण झाली आहेत. पुलाला इतकी वर्षे झाली असली तरी पूल अजूनही भरभक्कम अवस्थेत आहे. परंतु पंढरपूर – महाड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे हा पूल पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पुलाला कोणताही धोका नसतानाही रस्त्याच्या कामातील तांत्रिक कारणास्तव हा पूल हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने इतिहासप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. शिंदेवाडी (ता. खंडाळा) ते भोर – वरंधा घाट या मार्गाचे काम सध्या सुरू आहे. या कामाच्या अंतर्गत उत्रौली ते भोर दरम्यान असलेला रामबाग येथील हा ऐतिहासिक पूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ वाहतुकीचा मार्गच नव्हे, तर भोरच्या इतिहासाची साक्ष देणारी वास्तूही काळाच्या पडद्याआड जाणार आहे.
मुंबईचे तत्कालीन अभियंता विश्वास नाईक यांनी सुमारे २० हजार रुपये खर्चून हा पूल बांधला होता. ८ डिसेंबर १८८५ रोजी तत्कालीन बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड रिये यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले होते. विशेष म्हणजे, पुलाच्या वरच्या बाजूस असलेल्या बंधाऱ्यातून पूर्वी सायफन पद्धतीने कोणत्याही विजेचा वापर न करता भोर शहराला शुद्ध पाणीपुरवठा केला जात होता. राजवाड्यासमोरील कारंजेही याच पाण्यावर चालत असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे या पुलाला भोरच्या ऐतिहासिक आणि जलव्यवस्थापनाच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. रस्त्याचे काम होणार असले तरी ऐतिहासिक पूल पाडण्याऐवजी त्याचे जतन करून नव्या पुलाची पर्यायी व्यवस्था करता आली असती, अशी भावना इतिहासप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे. हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची मागणी अद्याप शासनाच्या पातळीवर पोहोचलेली नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.





