Shikrapur News: मिनिटांचा उशीर अन् घात झाला असता! विहिरीत पडलेल्या महिलेसाठी ‘आपदा मित्र’ ठरले देवदूत
Shikrapur News: आपदा मित्रांचे अध्यक्ष राहुल गायकवाड आणि सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य; महिलेला वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने प्रकृती स्थिर.

Shikrapur News- येथील चाकण रस्त्यालगत अथर्वनगर परिसरात रात्रीच्या अंधारात विहिरीत पडलेल्या महिलेसाठी शिक्रापूर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी आणि आपदा मित्रांचे पथक देवदूत ठरले. जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अथर्वनगर येथे नवरात्रोत्सवासाठी मंडप उभारण्याचे काम काही युवक रात्री दोन वाजण्याच्या सुमारास करीत होते. त्यावेळी शेजारील विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने युवकांनी विहिरीत पाहिले असता एक महिला पाण्यात पडल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे, पोलीस शिपाई शरद धूरपते तसेच आपदा पथकाचे अध्यक्ष राहुल गायकवाड, शेरखान शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस शिपाई शरद धूरपते यांनी भर अंधारात थेट विहिरीत उडी घेतली. पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे आणि आपदा पथकातील शेरखान शेख हेही विहिरीत उतरले. त्यानंतर अमोल नप्ते, राधेशाम चव्हाण, गणेश तौर, शुभम सपकाळे, सिद्धेश डफळ, रवी जगताप, अनिकेत चकोर, सुमित भोगाडे,
पवन माळी यांच्यासह नागरिकांच्या मदतीने महिलेचा शोध घेऊन तिला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. महिलेला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या धाडसी बचावकार्यात सहभागी झालेल्या शिक्रापूर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी आणि आपदा मित्रांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
दहा मिनिटांचा विलंबही ठरला असता जीवघेणा
विहिरीत पडलेल्या महिलेवर उपचार सुरू असलेल्या माऊलीनाथ मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. पवन सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. मात्र, महिला रुग्णालयात आणखी दहा मिनिटे उशिरा आली असती, तर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता होती. वेळेत केलेल्या बचावकार्यामुळे महिलेचे प्राण वाचल्याचे त्यांनी सांगितले.





