Purandar News: पुरंदरमध्ये रब्बी हंगाम धोक्यात! पावसाने फिरवली पाठ; ओढे-बंधारे पडले कोरडेठाक
Purandar News: मान्सूनचा पाऊस अत्यल्प झाल्याने पुरंदर तालुक्यात पाणीटंचाई; सप्टेंबर पाठोपाठ ऑक्टोबरमध्येही उष्णता वाढल्याने जमिनीतील ओलावा गायब.

Purandar News- यंदा पुरंदर तालुक्यात मान्सूनपूर्व तसेच मान्सूनचा पाऊस अत्यल्प झाल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. सप्टेंबरपासून वाढलेल्या उष्णतेत ऑक्टोबरमध्येही दिवसेंदिवस भर पडत असल्याने जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगाम संकटात सापडण्याची चिन्हे असून, पुढील काही दिवसांत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या नाहीत तर रब्बी पिकांसह फळबागांवरही संकटाची कुर्हाड कोसळण्याची भीती शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे.
यंदाच्या खरीप हंगामातही पाण्याच्या संकटामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस वेळेवर न झाल्याने खरीप हंगाम लांबला असून, कोरडवाहू क्षेत्रातील पेरणीमध्येही मोठी घट झाली आहे. सध्या उभी पिके पाण्याअभावी कोमेजू लागली असून, जमिनी कोरड्या पडत आहेत. त्यामुळे खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच शेतकर्यांसमोर रब्बीची चिंता उभी राहिली आहे. ओढे, तलाव आणि बंधार्यांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने संरक्षित सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळीही तळाला गेल्याने रब्बी हंगामातील गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकांच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे. कमी पाण्यात येणार्या रब्बी ज्वारीची पेरणी करण्याशिवाय शेतकर्यांसमोर पर्याय नसला, तरी त्यासाठीही पुरेसा ओलावा उपलब्ध होईल का, याबाबत साशंकता आहे. यंदा पावसाअभावी तालुक्यातील ओढे-नाले आणि बंधारे कोरडेठाक पडले आहेत.
जलसंधारणाची कामे झाली; मात्र पावसाअभावी बंधारे कोरडे
पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील काही वर्षांत ओढ्यांचे खोलीकरण, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आणि माती बंधार्यांची मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. माणिकचंद धारिवाल ट्रस्ट, खासदार निधी, आमदार निधी, श्री दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, जिल्हा परिषद, विविध स्वयंसेवी संस्था, कंपन्या तसेच जलयुक्त शिवार अभियानातून ही कामे करण्यात आली आहेत.





