वडगाव मावळ, {किशोर ढोरे} – निवडणूक प्रचारासाठी सभा व मेळावे यांना गती आली आहे. मात्र प्रचाराचा धुरळा अजूनही गावोगावी वाड्या-वस्त्यांवर उडालेला दिसत नाही. प्रचारासाठी अवघ्या ३५ दिवसांचा कालावधी राहिला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ मोठा असल्याने उमेदवारांची मदार आता स्थानिक कार्यकर्त्यांवर आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रचारासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते पुढाकार घेत असून घरोघरी भेटी दिल्या जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांमध्ये प्रचाराची रणधुमाळी गावोगावी पोहचलेली असते. त्या तुलनेत लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सध्यातरी थंडच आहे. मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघात जोरदार चुरस निर्माण झालेली आहे.
प्रत्येक उमेदवाराला मतदान केंद्रनिहाय प्रचार करायवयाचा म्हटला तरीही वेळ कमी आहे. त्यामुळे मुख्य उमेदवारांनी शहरी भाग, मोठ्या पालिका व ग्रामपंचायती, महत्त्वाचे विभाग, समाज मंडळे यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गावपातळीवरील प्रचाराचे काम स्थानिक आमदार व कार्यकर्त्यांवर सोपवले आहे.
गावातील प्रमुख कार्यकत्यांवर आपपल्या पक्षाचा व विभागाचा प्रचार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे वातावरण शहर व निमशहरी भागात अधिक तापले आहे. ग्रामीण भागात पक्षाचे शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, तालुका प्रमुख, तालुकाध्यक्ष व गावपातळीवरील कार्यकर्ते करीत आहेत.
कार्यकर्ते फोडण्याचे काम
प्रचाराची प्रमुख भिस्त कार्यकर्त्यांवरच असल्याने कार्यकर्ते फोडण्याचे काम राजकीय पातळीवर सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश वाढले आहेत. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यास त्या पक्षाचा विजय हमखास तर गद्दारी केल्यास पराभवही अटळ असे चित्र मतदार संघात आहे.
१३ मे रोजी मतदान
मावळ लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. येथील मतदार नेमका कोणाला साथ देऊन आपला लोकप्रतिनिधी म्हणून केंद्रात पाठवणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पारदर्शक मतदानासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हीगील हा अॅप सर्वांसाठी खुला केला आहे. लोकसभेच्या मावळ मतदार संघात घाटाखालचे येणारे कर्जत, पनवेल आणि उरण या विधानसभा मतदार आहेत, तर घाटावरचे पिंपरी, चिंचवड आणि मावळ हे विधानसभा मतदार संघ येतात.
प्रचार नाही पण चर्चा मात्र जोरदार
यंदाच्या निवडणुकीत राज्यात कोणाला जोरदार झटका बसेल, याची गणितेे कार्यकर्ते मांडताना दिसत आहेत. आपल्या पक्षाचा स्थानिक नेता कसा पावरफूल आहे याबाबतही राजकीय चर्चांना गावागावातून ऊत आला आहे. आपला नेता उमेदवाराला झटका देईल का, अशाही चर्चा पारावर रंगत आहेत.