तेल अविव – हसणे आणि रडणे या सर्वसाधारण नैसर्गिक क्रिया असल्या तरी महिलांच्या रडण्यामुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अश्रूमध्ये मोठी ताकद आहे. महिलांचे अश्रू पाहून आक्रमक पुरुषही नॉर्मल होऊन माघार घेतात. इस्त्रायलमध्ये झालेल्या एका संशोधनातून हा निष्कर्ष समोर आला आहे.
इस्त्रायलमधील वेजमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या प्रख्यात संस्थेने हे संशोधन केले आहे. महिलांच्या अश्रूला एक विशिष्ट प्रकारचा गंध असतो. हा गंधच पुरुषांमधील आक्रमकता कमी करतो, असे या संशोधनात म्हटले आहे. रडण्यानंतर निर्माण होणाऱ्या अश्रूंमध्ये एक प्रकारचे रासायनिक तत्व असते. पुरुषांच्या मेंदूमध्ये आक्रमकता निर्माण करणाऱ्या ज्या नर्व्हज असतात त्या नर्व्हजला रासायनिक तत्त्व विशिष्ट सिग्नल देते आणि पुरुषांचा आक्रमकपणा 40 टक्क्यांनी कमी होऊ शकतो, असेही या संशोधनात म्हटले आहे.
संशोधनासाठी संबंधित संशोधकांनी स्त्रियांच्या प्रत्यक्ष अश्रूचे नमुने जमा केले होते. चित्रपट पहात असताना जेव्हा स्त्रियांना रडू येते तेव्हा जे अश्रू निर्माण होतात त्याचे कलेक्शन या संशोधकांनी केले होते. त्यानंतर 31 पुरुषांच्या एका समूहाला जेथे मुद्दाम राग निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. त्या समूहातील पुरुषांना विविध प्रकारचे गंध देण्यात आले त्यामध्ये जेव्हा त्यांनी या महिलांच्या अश्रूंचा वास घेतला तेव्हा त्यांचा आक्रमकपणा कमी झाल्याचे लक्षात आले.