पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. असं असताना काल रात्री पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन नेत्यांच्या समवेत एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही महापालिका निवडणुकीसाठी चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज शुक्रवारी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत दोन राष्ट्रवादी एकाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, असा प्रस्ताव अजित पवारांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना दिला. अजित पवारांचा निरोप आज शशिकांत शिंदे यांना थोड्यावेळात कळवळा जाणार आहे. असं असलं तरी घड्याळ चिन्ह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य होणार का? हे पाहावे लागेल. “आज संध्याकाळपर्यंत निरोप द्या”, असं अजित पवारांनी बैठकीला आलेल्या नेत्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. दोन्ही गटातील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या काल अचानक रात्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार या दोन नेत्यांनी अजित पवार यांची पुण्यातील बंगल्यावर जात त्यांची भेट घेतली. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन महापालिकांसाठी एकत्र येण्यावर अनेक तर्क वितर्क लावले जात असतानाच ही अत्यंत महत्वाची घडामोड मानली जात आहे. त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचे सूत्र ठरले आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या गुप्त बैठकीचा सविस्तर तपशील अद्याप समोर आलेला नाही.