मुंबई – जैन समुदायाच्या पर्युषण पर्वकाळात ८ दिवसांच्या कालावधीत पशुहत्या आणि मांस विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका जैन समुदायाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पर्युषण पर्व तोंडावर असल्याने नाशिक, मुंबई, पुणे पालिकांनी यावर विचार करून तत्काळ निर्णय घ्यावा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
मुंबईच्या शेठ मोतीशाॅ लालबाग जैन चॅरिटीज ट्रस्टने याबाबत याचिका दाखल केली आहे. पर्युषण पर्व ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत आहे. या काळात पशुहत्या आणि मांस विक्रीवर तात्पुरती बंदी घालावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
बंदी नसल्यास पर्युषण पर्वाच्या काळात जैन समुदायावर पशुहत्या आणि मांसविक्री पाहण्याची वेळ येते असे याचिकेत म्हटले आहे. यावर पशुहत्या आणि मांस विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याबाबत महापालिकांनी विचार करून तत्काळ निर्णय घ्यावा, असे निर्देश काेर्टाने दिले.