“दोन दिवसात निर्णय न झाल्यास…”; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत रोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले “ठाकरे बंधू…”

Rohit Pawar : आज २४ डिसेंबरला गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर आज तो दिवस उजाडला असून ठाकरे बंधू राजकीय युतीची घोषणा करणार आहेत. मुंबईसह मुंबई क्षेत्रातील महत्वाच्या महापालिकांवर ठाकरे बंधू एकत्र निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. मुंबईसह महत्वाच्या महापालिकांवर उबाठा आणि मनसे यांची युती होणार असल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका असणार याबाबत पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
आमचे लोक काल त्यांना भेटले आहेत. आम्ही कुठून लढू इच्छित आहे हे त्यांना सांगितलं आहे. 2 दिवसांत आम्हाला निर्णय आला नाही तर स्वबळावर जाण्याबाबत निर्णय घेऊ, अशी भूमिका रोहित पवार यांनी जाहीर केली आहे. ठाकरे बंधू न्याय देत नसतील तर काँग्रेस सोबत वेगळा निर्णय घेऊ, असेही रोहित पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असेल, असेही रोहित पवार म्हणाले. त्यामुळे ठाकरे बंधूंची महापालिका निवडणुकीसाठी असलेली युती महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना दुखावणारी आहे का? असे बोलले जात आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
ठाकरे बंधूंचे युतीचे घोडे केवळ जागावाटपावर अडले असल्याचे सांगितले जात असून, आता जागावाटपाचा तिढा सुटला आहे. त्यामुळेच तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीची घोषणा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. युतीची घोषणा होत असताना ठाकरे बंधू केवळ १५ जागा द्यायला इच्छुक आहेत. त्यातील बहुंताशी जागा पडणाऱ्या आहेत. जे जिंकणारे उमेदवार आहेत, त्यांना संधी द्यायला हवी. त्यांनी हट्ट करून उपयोग नाही, अन्यथा वेगळा निर्णय घ्यावा लागेल, अशी रोखठोक भूमिका रोहित पवार यांनी जाहीर केली आहे.
हेही वाचा : राज आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर; थोड्याच वेळात होणार ठाकरे बंधुंच्या युती घोषणा





