प्रभात वृत्तसेवा पुणे – आगामी महापालिका निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र लढण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दुफळी माजली आहे. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आपण राजकारण सोडणार, अशी भूमिका पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाहीरपणे मांडल्यानंतर माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी जगताप यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात लढण्याची पक्षाची भूमिका असून, त्यासाठी समविचारी पक्षासोबत आघाडी करण्यात काहीच गैर नसल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले आहे. प्रशांत जगताप म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नाही. पक्षफुटीनंतर आम्ही सर्वजण साहेबांच्या विचारधारेनुसारच काम करत आहोत. त्यामुळे कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास आधी पक्षातील कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी. त्यानंतर वैयक्तिक, नाही तर पक्ष म्हणून भूमिका मांडावी, असेही तांबे यांनी जगताप यांना सुनावले आहे.तांबे म्हणाले, की २०१७ मध्ये महापालिकेत राष्ट्रवादीचे ४२ नगरसेवक निवडून आले होते. ते सर्व भाजपच्या विरोधात निवडून आले होते. त्यानंतर आता पक्ष विभागला आहे. ही विभागणी वैयक्तिक किंवा कौटुंबिक नाही, तर राजकीय भूमिकेतून हे दोन पक्ष तयार झाले आहेत. त्यामुळे कधी ना कधी आणि कोणत्या तरी निवडणुकीत दोन्ही पक्ष राजकीय भूमिकेतून एकत्र येणार, हे नक्की आहे. त्यासाठी ही निवडणूक निमित्त असू शकते. यात काहीच गैर नाही. त्यामुळे शहराध्यक्ष जगताप यांनी व्यक्तिगत भूमिका न मांडता पक्षाची भूमिका मांडावी. बैठक घेऊन चर्चा करावी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणत्याही पातळीवर थेट चर्चा नाही. दोन्ही पक्षांतील स्थानिक नेते याबाबत भूमि मांडत आहेत. अशा वेळी शहराध्यक्ष म्हणून जगताप यांनी शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. त्यावेळी सर्वांशी चर्चा करावी. त्याचा अहवाल पक्षाच्या प्रदेशाध्यक्षासह वरिष्ठ नेत्यांकडे पाठवावा. त्यानंतर ते जे सांगतील, ती पक्षाची अधिकृत भूमिका असेल. त्यामुळे जगातप यांनी वैयक्तिक भूमिका न मांडता बैठक घेऊन सर्वांशी चर्चा करावी, अशी मागणी तांबे यांनी केली आहे. कार्यकर्ते संभ्रमात मागील दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच गोंधळात सापडले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कांग्रेस स्वबळावर लढणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीसोबत लढणार आहे. हे दोन स्वतंत्र पक्ष झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. मात्र, आता पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र झाल्यास अनेकांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागणार आहे. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.