जागावाटपावरून खलबतं! पुणे, पिपरी-चिंचवड महापालिकांसाठी दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक; पुढचे दोन दिवस महत्वाचे

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. अशातच काल रात्री पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन नेत्यांच्या समवेत एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही महापालिका निवडणुकीसाठी चर्चा करण्यात आली असून, जागावाटप करण्यासाठी अंतिम निर्णय घ्यावी लागतील, अशी भूमिका नेत्यांनी मांडली.
काल अचानक रात्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार या दोन नेत्यांनी अजित पवार यांची पुण्यातील बंगल्यावर जात त्यांची भेट घेतली. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन महापालिकांसाठी एकत्र येण्यावर अनेक तर्क वितर्क लावले जात असतानाच ही अत्यंत महत्वाची घडामोड मानली जात आहे. त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचे सूत्र ठरले आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या गुप्त बैठकीचा सविस्तर तपशील अद्याप समोर आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत दोन्ही महापालिकांसाठी अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांच्यात एक तास चर्चा झाली. अजित पवारांच्या इच्छुक उमेदवारांच्या जागी शरद पवार इच्छुकांनी दावा केला आहे. यामुळे बरीच घासाघासी झाली असून कसा तोडगा काढण्यात येणार हे पाहावे लागणार आहे. मात्र,बैठकीत कोणत्या ठिकाणी नेमके कोणाचे उमेदवार द्यायचे तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घ्यायचं का? यावर देखील बरीच चर्चा झाली आहे.
रोहित पवार गाडीतून बाहेर पडले अन्…
बैठक संपल्यानंतर अजित पवारांच्या बंगल्यातून भरधाव वेगात निघालेल्या वाहनातून रविकांत वरपे यांच्यासह रोहित पवार हे बाहेर पडले. माध्यमांना टाळण्यासाठी स्वतःची गाडी न वापरता दुसरी गाडी अजित पवारांच्या बंगल्यातून अत्यंत वेगात बाहेर पडली. मुख्य रस्त्याजवळ थांबलेल्या पत्रकारांना पाहून या वाहनाच्या चालकाने आणखी वेग वाढवला. सुदैवाने गर्दी कमी असल्याने तसेच पत्रकारांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला.





