Sunetra Pawar on Nana Patekar: “अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!” ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली
Sunetra Pawar on Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वासह सामाजिक क्षेत्राचीही मोठी हानी झाली असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली.

Sunetra Pawar on Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वासह सामाजिक क्षेत्राचीही मोठी हानी झाली असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली. नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
नाना पाटेकर यांनी भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने मराठीसह भारतीय कलाविश्वाने एक हरहुन्नरी आणि संवेदनशील कलाकार गमावला असल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं.
“नाना पाटेकर हे केवळ उत्कृष्ट अभिनेते नव्हते, तर अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी अनेक व्यक्तिरेखा अजरामर केल्या,” असं सुनेत्रा पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं.
‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’ यांसारख्या कलाकृतींमधून नाना पाटेकर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर उमटवलेली अमीट छाप रसिकांच्या मनात कायम राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
‘नानांचे अजितदादांशी जिव्हाळ्याचे संबंध होते’ Sunetra Pawar on Nana Patekar:
नाना पाटेकर आणि पवार कुटुंबातील आपुलकीच्या संबंधांचा उल्लेख करताना सुनेत्रा पवार भावुक झाल्या. नाना पाटेकर यांचे अजित पवार यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि स्नेहाचे संबंध होते, असं त्यांनी सांगितलं.
अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला अक्षरशः चटका लावणारी आहे.
अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम असलेल्या नानांनी रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाने असंख्य व्यक्तिरेखा अजरामर केल्या. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’ यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी आपल्या अभिनयाची अमीट छाप उमटवली.
नाना पाटेकर यांचे दादांशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने झालेली पोकळी माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठीही विशेष दुःखद आहे.
कलेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाजातील वंचित घटक आणि शेतकरी बांधवांसाठी केलेले कार्यही सदैव प्रेरणादायी राहील.
आज अभिनयविश्वातील एक संवेदनशील मन, एक दमदार आवाज आणि एक अस्सल कलाकार हरपला आहे.
या अष्टपैलू, संवेदनशील कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
नानांच्या स्मृती, त्यांच्या भूमिका आणि त्यांचे अमूल्य योगदान सदैव आपल्या मनात जिवंत राहील.— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) October 8, 2026
“कौटुंबिक सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात ते नेहमी पाठीशी उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी ही माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत वैयक्तिक आणि विशेष दुःखद आहे,” अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘नाम फाउंडेशन’च्या कार्याचीही आठवण Sunetra Pawar on Nana Patekar:
अभिनयातील यशाच्या शिखरावर असतानाही नाना पाटेकर यांनी सामाजिक बांधिलकीचे भान कधीही सोडलं नाही, असं सुनेत्रा पवार यांनी नमूद केलं. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी वंचित घटक, दुष्काळग्रस्त आणि शेतकरी बांधवांसाठी केलेलं कार्य कायम प्रेरणादायी राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कलेसोबतच सामाजिक सेवेचा ध्यास घेणाऱ्या या अष्टपैलू आणि संवेदनशील कलाकाराच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणं कठीण असल्याचं सांगत सुनेत्रा पवार यांनी नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.





