Madhuri Elephant | माधुरी हत्तीण परत येणार? कोल्हापुरकरांना मुख्यमंत्र्यांचा मोठा शब्द

कोल्हापूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात हलवण्याच्या निर्णयाने कोल्हापूर आणि परिसरात तीव्र नाराजी पसरली होती.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरकरांच्या भावनांचा आदर करत महादेवीला परत आणण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
5 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी स्पष्ट केले की, “महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण परत यावी, ही आमची भूमिका आहे. तिची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे पथक तयार केले जाईल, आणि राज्य सरकार नांदणी मठासोबत पूर्ण ताकदीने उभे राहील.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्रालयात आयोजित बैठकीत महादेवी हत्तीणीच्या परतीसाठी कायदेशीर आणि प्रशासकीय पावले उचलण्याचे निर्देश दिले. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, गणेश नाईक, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते
फडणवीस यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून महादेवीला परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. यासाठी सरकार स्वतः बाजू मांडेल. महादेवीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नेमले जाईल. तसेच, तिच्यासाठी रेस्क्यू सेंटर आणि योग्य आहाराची व्यवस्था केली जाईल.
तसेच “महादेवी हत्तीण आणि मुंबईतील कबुतरखाना प्रकरणामागे न्यायालयाचे आदेश आहेत, सरकारने स्वतःहून कोणतीही कारवाई केलेली नाही. पण जनभावनांचा आदर करून मार्ग काढला जाईल,” असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले.





