Pune News | विद्यापीठ चौकातील उड्डाण पुलाचे लोकार्पण

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाण पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.
या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार हेमंत रासणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहरचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, मुख्य अभियंता रिनाज पठाण आदी उपस्थित होते.
लोकार्पणानंतर त्यांनी दुमजली उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी केली. महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली.पुलाची एक मार्गिका औंध- शिवाजीनगर वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. शिवाजीनगर व औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरित बाणेर व पाषाण बाजूकडील रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
भाजप- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत घोषणाबाजी..
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमासाठी इच्छुकांसह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती, तसेच या कामाचे श्रेय घेण्यावरून भाजप- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे या वेळी दिसून आले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यासपीठाच्या समोरील बाजूस दोन्ही बाजूला दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते बसले होते.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकच वादा… अजित दादा.. अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांना प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून महाराष्ट्राचा एकच वाघ.. देवा भाऊ..देवा भाऊ..अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांमुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीला काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.





