Satara News | राज्यात सुरु होणार ‘मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान’

प्रभात वृत्तसेवा
सातारा – राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या कार्यकाळात धडाकेबाज निर्णय घेतल्याने ग्रामविकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळत आहे. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान राबवत ग्रामीण विकासाचा व्यापक उपक्रम जयकुमार गोरे यांनी हाती घेतला आहे. या अभियानातून गावोगावी लाेकचळवळ उभारण्यासाठी मंत्री गोरे प्रयत्न करत आहेत.
जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास खात्याचा पदभार मिळाल्यापासून त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासात भरारी घेतली आहे. पक्षातील वरिष्ठ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील ती जबाबदारी सर्व ताकदीनिशी पार पाडत आहेत. ग्रामीण भागामध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे, आर्थिक- सामाजिक आणि भौतिक विकास साधणे आणि ग्रामस्थांचे जीवनमान उंचावणे हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा उद्देश आहे. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील विजेत्यांना कोट्यवधींची बक्षीसे दिली जाणार आहेत. दि. १७ स्पटेंबरपासून या अभियानाचा प्रारंभ होणार आहे.
राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे ग्रामस्वच्छता अभियानातील योगदान आजही महाराष्ट्रातील अनेक गावांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी स्वच्छतेला सामाजिक चळवळ बनवले. आता जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांतून ग्रामीण विकासाला चालना मिळावी, म्हणून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरु केले जाणार आहे.
दुष्काळी भागाचे नेतृत्व करीत असताना जयकुमार गोरे यांनी जिहे- कठापूर, उरमोडी, टेंभू, तारळी योजनांचे पाणी आणून माण- खटावच्या माळरानावर हरितक्रांती करण्याचा इतिहास निर्माण केला. ग्रामविकास मंत्री झाल्यापासून घरकुल योजना, आषाढी पायी वारी सोहळा, महापुरुषांची स्थळे याबाबतचा सर्वागीण विकास साधला जात आहे. यांसह राज्यात ग्रामविकासाच्या सर्व अंगांच्या अनुषगांने उपक्रम राबविले जात आहेत.
राज्यातील ३ पंचायत समित्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार असून प्रथम २ कोटी, द्वितीय १.५ कोटी, तृतीय १.२५ कोटी, विभागस्तरीय पुरस्कार- प्रत्येक विभागात ३ पंचायत समित्या पुरस्कार. प्रथम १ कोटी, द्वितीय ७५ लाख, तृतीय ६० लाख. जिल्हा परिषदांना देण्यात येणारे पुरस्कार : राज्यस्तरीय पुरस्कार राज्यात ३ जिल्हा परिषदांना पुरस्कार : प्रथम क्रमांकास ५ कोटी, द्वितीय ३ कोटी, तृतीय २ कोटी बक्षीस दिले जाणार आहे. विभाग आणि राज्यस्तरावर पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठीही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींसाठी कोट्यवधींची बक्षीसे..
या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार असून प्रथम ग्रामपंचायतीस ५ कोटी रुपये, द्वितीय ३ कोटी, तृतीय २ कोटी, विभागस्तरीय पुरस्कार-प्रत्येक विभागात ३ ग्रामपंचायतीना पुरस्कार. प्रथम १ कोटी, द्वितीय ८० लाख, तृतीय ६० लाख, जिल्हास्तरीय पुरस्कार प्रत्येक जिल्ह्यात ३ ग्रामपंचायतीना पुरस्कार. प्रथम ५० लाख, द्वितीय ३० लाख, तृतीय २० लाख, तालुकास्तरीय पुरस्कार:- प्रत्येक तालुक्यात ३ ग्रामपंचायतीना पुरस्कार : प्रथम १५ लाख, द्वितीय १२ लाख, तृतीय ८ लाख, विशेष पुरस्कार: प्रत्येकी तालुक्यातील २ ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहेत.
“ग्रामपंचायत पदाधिकारी, तरुण मंडळे, सामाजिक संस्था, प्रशासनातील आजी- माजी अधिकाऱ्यांनी सहभागी होऊन शासनाच्या या योजनेची १०० टक्के अंमलबजावणी करावी. एक समृध्द गाव बनविणे, हा संकल्प घेऊन आपण पुढे चाललो आहोत. या अभियानात पंचायतराज व्यवस्थेतील सर्वांनी सहभागी होऊन समृध्द आणि विकसित गाव बनविण्याच्या दृष्टीने सगळेजण प्रयत्न करुयात.”
– जयकुमार गोरे (ग्रामविकास व पंचायत राज मंत्री, महाराष्ट्र)





