महादेवीला परत आणण्यासाठी मूक मोर्चा; हजारो कोल्हापूरकरांसह सर्वधर्मीय उतरले रस्त्यावर
कोल्हापूर – जिल्ह्यातील नांदणी मठातील माधुरी अर्थात महादेवी हत्तीण गुजरातमधील वनतारा येथे पाठवल्यामुळे ग्रामस्थांसह कोल्हापुरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. यामुळे कोल्हापूरसह परिसरातील लोकप्रतिनिधी, नागरिक आणि विविध संघटनांनी महादेवी हत्तीणला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या पार्श्वभूमीवर श्री 1008 भगवान महावीर जयंती उत्सव समिती, इचलकरंजी आणि समस्त जैन बांधवांच्या वतीने नांदणी ते कोल्हापूर मूक पदयात्रा काढण्यात आली.
या पदयात्रेला रविवारी पहाटे नांदणीतून सुरुवात झाली. ही यात्रा सांगली-कोल्हापूर महामार्गाने शिरोली फाटा, पुणे-बंगळूरु महामार्गावरील तावडे हॉटेल, ताराराणी पुतळा, दाभोळकर कॉर्नर, बसंत बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे पोहचला. या पदयात्रेत कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो नागरिक सहभागी झाले आहेत.
पदयात्रेतील सहभागी नागरिकांनी ‘माधुरी परत करा’ आणि ‘जिओ बॉयकॉट’ असे लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. ‘एक रविवार माधुरीसाठी’ असं म्हणत नागरिक मोठ्या संख्येने या मूक पदयात्रेत सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देऊन महादेवी हत्तीण परत आणण्याची मागणी नागरिक करणार आहेत.
राष्ट्रपतींनाही साकडं
शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला परत पाठवण्यासाठी 48 तासांत तब्बल सव्वादोन लाखांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी केलेले पत्रांचे गढे आज पोस्ट विभागामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठविण्यात आले.
दरम्यान, महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आश्वासन देण्याऐवजी किती दिवसांत महादेवी परत येणार, हे ठोसपणे जनतेसमोर जाहीर करावे, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
माधुरी हा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक धार्मिक कार्यात तिला महत्त्वाचं स्थान होतं. जिओवर बहिष्कार हे फक्त पहिलं पाऊल आहे. यापुढं रिलायन्स मॉलवर देखील आम्ही बहिष्कार टाकू.
ज्या वनतारा केंद्रामध्ये हत्तीणला पाठवलय ते हत्ती केंद्रच बेकायदेशीर आहे. याबाबत आम्ही राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे. माधुरीला परत आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.
– राजू शेट्टी, माजी खासदार





