Alandi News | ज्ञानेश्वरीतील विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे मूळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रभात वृत्तसेवा
आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली आहे. ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे मूळ असून तो जगाला मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती दिनानिमित्त आयोजित संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण समारंभात ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, मारुती महाराज कुरेकर, नारायण महाराज जाधव, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, बापूसाहेब पठारे, महेश लांडगे, बाबाजी काळे, देवेंद्र पोटे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, अॅड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, अॅड. रोहिणी पवार, चैतन्य महाराज कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्या संस्कृतीतील प्राचीन मूल्ये जपाण्याचे श्रेय वारकरी संप्रदायला आहे. ही मूल्य विचारांची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नेल्याने आम्ही परकीय आक्रमण होत असतांना राजकीय गुलामगिरी स्वीकारली, पण वैचारिक गुलामगिरी स्वीकारली नाही. वारकरी परंपरेने आणि संतांनी जात, धर्म भेदामुळे गुलामगिरीत जाणार्या समाजात ऐक्य निर्माण करण्याचे कार्य केले.
माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हीच शिकवण दिली आहे, 21 वर्षांच्या जीवनात त्यांनी दिलेला विचार आपल्याला शतकानुशतके मार्ग दाखविणारा आहे. म्हणूनच समाधी मंदिरात आल्यावर मिळणारी ऊर्जा चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते. विचार आणि तत्वज्ञानाचा निर्मळ प्रवाह असलेली भारतीय सभ्यता सर्वात जुनी सभ्यता आहे हे जगाने मान्य केले असल्याचेही ते म्हणाले.भगवद्गीतेतील तत्वज्ञान हे जगातले सर्वोत्तम तत्वज्ञान असून ते जगात स्वीकारले जात आहे. माऊलींनी 9 हजार ओव्याच्या माध्यमातून मांडलेले हे ज्ञान ऑडिओ बुकच्या माध्यमातून सर्व भाषेत उपलब्ध होणार असल्याने ते जगभरात पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णकलश पूजन आणि श्री ज्ञानेश्वरी (सार्थ) ऑडिओ बुक विविध भाषेत उपलब्ध असलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या संकेतस्थळाचे विमोचन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थित भाविकांच्या वर्गणीतून तयार करण्यात आलेला हा 22 किलोचा सुवर्ण कलश समाधी मंदिरावर चढविण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते महाद्वार जीर्णोद्धार कार्यारंभ पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सुवर्णकलश आणि महाद्वारासाठी योगदान देणार्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
सुवर्णकलशासाठी भक्तांचे समपर्ण..
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अर्जुनाला कर्म मार्ग दाखविण्यासाठी भगवान योगेश्वराने गीता सांगितली, गीतेचे मराठीत विवेचन करणार्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कळस आजच्या दिवशी चढविला जाणे हा एक सुवर्णयोग आहे. भक्तांनी दान नव्हे तर समर्पण केल्याने हा सुवर्ण कलश चढविला गेला. सुवर्ण कलशासोबत महादजी शिंदे यांनी उभारलेल्या महाद्वाराचा जीर्णोद्धार केल्याने त्याला मूळ स्वरूप प्राप्त होईल आणि मंदिर परिसराच्या पावित्र्यात भर पडेल.





