कोण होतास तू, काय झालास तू..? अमित शाहांची लोकसभेतून उद्धव ठाकरेंवर आगपाखड, ‘त्या’ स्वाक्षरीवरून फडणवीसांनी डिवचले…

Amit Shah | Devendra Fadnavis | Uddhav Thackeray : तमिळनाडूमधील द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाच्या खासदारांनी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची औपचारिक मागणी करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव मंगळवारी (९ डिसेंबर) सादर करण्यात आला.
भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद १२४ आणि २१७ अंतर्गत न्यायमूर्तींवर महाभियोग चालवण्याची तरतूद आहे. या प्रस्तावाला INDIA आघाडीतील विविध घटक पक्षांचा पाठिंबा मिळाला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांचीही स्वाक्षरी त्यावर आहे.
अमित शाहांची तीव्र टीका :
या प्रस्तावावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत जोरदार प्रतिक्रिया देत विरोधकांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “भारत स्वतंत्र झाल्यापासून कधीही न घडलेली गोष्ट हे लोक आज करत आहेत. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव फक्त मतपेढी वाचवण्यासाठी आणण्यात आला आहे. INDIA आघाडीतील सर्वांनी त्यावर स्वाक्षरी केली असून उद्धव ठाकरे यांनीही याला पाठिंबा दिला आहे.”
अमित शाह यांनी पुढे स्पष्ट केले की, “एका डोंगरावर, सर्वात उंचावर दिवा लावण्याबाबतचा निकाल त्या न्यामूर्तींनी दिला होता. त्याविरोधात हे लोक त्यांची मतपेढी वाचवण्यासाठी महाभियोगाचा प्रस्ताव घेऊन आले आहेत. देशातील जनता यांना माफ करणार नाही, जनता या विरोधकांना असल्या उद्देशांमध्ये मदत करणार नाही.”
कोण होतास तू, काय झालास तू?#UddhavThackeray pic.twitter.com/ZWsT4gu1CY
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 10, 2025
देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका :
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या भाषणातील एक भाग समाजमाध्यमांवर शेअर करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटलं आहे की “कोण होतास तू, काय झालास तू?” असं लिहलं आहे.





