Devendra Fadnavis | Uddhav Thackeray | Raj Thackeray – नुकत्याच नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणूकांमध्ये विरोधी पक्षातील नेते आपल्याच कार्यकर्त्यांना विसरले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूका लढवल्या पण, नेत्यांनी त्यांना वाऱ्यावर सोडले. विरोधी पक्षातील नेते कार्यकर्त्यांसाठी मैदानात उतरलेच नाहीत. या निवडणूका हारलो तर आपल्याला महापालिकेच्या निवडणूकीत जो ठाकरे ब्रॅंड दाखवायचा आहे, त्याचा फुगा फुटेल. त्यामुळे त्यांनी प्रचारात उतरण्याची हिंमतही दाखवलेली नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव व राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली. सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. हिवाळी आधिवेशनामध्ये लहान-मोठी अशी 18 विधेयके मांडली जाणार आहेत. या विधेयकांवर चर्चा करुन ती मंजूर केली जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमुळे या अधिवेशनला कमी वेळ मिळणार आहे. तरी देखील शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील कामकाज सुरु राहणार आहे. अधिवेशनातून पळून जाणे ही सरकारची मानसिकता नसल्याचे देखील फडणवीसांनी स्पष्ट केले. स्थानिक निवडणूकांच्या प्रचारामध्ये महायुतीतील भाजप व शिंदेसेना यांनी एकमेकांवर टीका केली होती. मात्र, त्यांच्यामध्ये अजूनही बेबनाव आहे का? अशी विचारणा करण्यात आली असता, आता आम्ही रोज एकमेकांशी बोलतो, त्यांचे रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतो. नाही तर रोज एक फोटो काढून इंन्स्टाग्रामवर टाकतो, असा उपरोधिक टोका फडणवीसांनी लगावला. ‘ते पद मिळेल, एवढे संख्याबळ नाही…’ – एकनाथ शिंदे विरोधक विरोधी पक्षनेता पाहिजे, अशी मागणी करत आहेत. मात्र त्यांना जनतेनेच झिडकारल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळावे एवढे संख्याबळ देखील त्यांच्याकडे नाही. त्यामुळे विरोधकांनी आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण करावे. आम्ही विरोधी पक्षांना कमी लेखत नाही, त्यांचा देखील सन्मान करतो. पुढील वेळी निदान विरोधी पक्षनेतेपद मिळेल, अशा दृष्टीकोनातून त्यांनी वाटचाल करावी, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.