Vijay Wadettiwar | विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयुक्तांची काल भेट घेऊन मतदार यादी आणि बोगस नावावरुन आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर संवाद साधला. बैठक झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र वाय.बी.चव्हाण येथे पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी निवडणूक आयोगाच्या सर्व्हरच्या सुरक्षिततेबद्दल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. तर भाजपचे पदाधिकारी असलेले देवांग दवे हे आयोगाची वेबसाईट हाताळतात, असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या पत्रकार परिषदेत देवांग दवे यांचं नाव घेत आरोप केला. ‘निवडणूक आयोगाचा मीडिया हँडलिंगचा भाग भाजपचा कार्यकर्ता कसा सांभाळतो?’ ते म्हणाले, “देवांग दवे या राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीला ही वेबसाईट हाताळण्याचे कंत्राट दिलं आहे. ते यात सहभागी असल्याचा आमचा गोड समाज आहे. निवडणूक आयोगाचा मीडिया हँडलिंगचा भाग भाजपचा कार्यकर्ता कसा सांभाळतो? मतदार यादीत गोंधळ आहे, मग निवडणूक कशी पारदर्शक होणार?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, “आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला सूचना केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या यादीतील मतदार यादीतील मतदारांचा शोध घ्या, बोगस मतदारांचा डेटा तयार करा. तो संयुक्तपणे निवडणूक आयोगाला सादर केला जाईल.” Vijay Wadettiwar | देवांग दवे कोण आहे? देवांग दवे भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक आहेत. दवेंनी आय सपोर्ट नरेंद्र मोदी डिजिटल मोहीम राबवली. वयाच्या 19व्या वर्षी दवेंनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसाठी स्वयंसेवक म्हणून काम सुरू केले. त्यांनी ‘आय सपोर्ट नरेंद्र मोदी’, ‘सोशल सेंट्रल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची स्थापना केली. 2012 मध्ये दवेंनी नरेंद्र मोदींच्या गुजरात भाजप मोहिमेत डिजिटल आणि प्रत्यक्ष रणनीतीचं काम पाहिलं. 2014-15 मध्ये दवेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आपलं सरकार’ उपक्रमात नेतृत्व केलं. 2021 मध्ये दवे भाजप महाराष्ट्राच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे सर्वात तरुण सदस्य बनले. 2024 मध्ये दवेंनी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जाहिरात मोहीम सांभाळली. Vijay Wadettiwar | जून 2025 मध्ये मुंबईतील कांदिवली पूर्वमधल्या जानुपाडा परिसरात देवांग दवे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाली. दवे आणि माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांच्या समर्थकांमधील वादात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. या घटनेनंतर समता नगर पोलिसांनी दवे यांना ताब्यात घेतले होते. ज्यामुळे भाजपातील अंतर्गत गटबाजी समोर आली होती. Vijay Wadettiwar | निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी दरम्यान, पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वीच वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना मतदार यादीमधील त्रूटी दाखवण्यात आल्या, तसेच जोपर्यंत या त्रूटी दुरूस्त होत नाहीत, तोपर्यंत निवडणूक सहा महिने पुढे ढकलावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. Vijay Wadettiwar | हेही वाचा: एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा! या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा; कशी असणार रणनिती?