Rohit Sharma Duplicate : कोण आहे रोहित शर्माचा डुप्लिकेट? ज्याचा ‘हिटमॅन’सोबतचा फोटो होतोय तुफान व्हायरल

Who is Rohit Sharma’s duplicate : विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या हंगामात सध्या भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या खेळीपेक्षा त्याच्या एका फोटोची अधिक चर्चा रंगली आहे. पहिल्या सामन्यात दीडशतक ठोकणारा रोहित दुसऱ्या सामन्यात ‘गोल्डन डक’वर (पहिल्याच चेंडूवर) बाद झाला. मात्र, या सामन्यानंतर सोशल मीडियावर रोहितचा मुंबईच्या यष्टीरक्षकासोबतचा एक फोटो तुफान व्हायरल होत असून, त्यात दोघेही हुबेहुब सारखे दिसत आहेत.
चाहते का झाले अवाक्?
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबई आणि सिक्कीम यांच्यात झालेल्या सामन्यात हा योगायोग पाहायला मिळाला. रोहित शर्मा स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना, त्याच्या मागे उभ्या असलेल्या यष्टीरक्षकाचा चेहरा आणि शरीरयष्टी रोहितसारखीच दिसत होती. हा खेळाडू दुसरा कोणी नसून मुंबईचा भरवशाचा यष्टीरक्षक-फलंदाजहार्दिक तामोरे आहे. या सामन्यात रोहित शून्यावर बाद झाला असला, तरी हार्दिकने ९३ धावांची स्फोटक खेळी करत मुंबईला ३३१ धावांचा डोंगर उभारून दिला.
कोण आहे हार्दिक तामोरे?
Wicket keeper looking like Rohit Sharma more than Rohit himself. pic.twitter.com/6Kw5Xl3QRC
— Nitesh Choudhary (@Imniteshkumar) December 25, 2025
ठाणे, महाराष्ट्र येथे २० ऑक्टोबर १९९७ रोजी जन्मलेला हार्दिक तामोरे गेल्या काही वर्षांपासून मुंबईच्या देशांतर्गत क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे. २०१९-२० च्या रणजी हंगामातून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे २०२१-२२ च्या रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने नाबाद शतक झळकावून मुंबईला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हेही वाचा – Ben Stokes : ‘कारकीर्दीतील सर्वात कठीण काळ!’, स्टोक्सची कबुली; बेन डकेटच्या मद्यधुंद व्हिडीओने पेटला वाद
उजव्या हाताचा हा फलंदाज मधल्या फळीत तांत्रिकदृष्ट्या सक्षम मानला जातो. परिस्थितीनुसार खेळणे, स्ट्राईक रोटेट करणे आणि मोक्याच्या क्षणी मोठे फटके मारणे ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. हार्दिकने सिक्कीमविरुद्ध ८२ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ९३ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे आणि रोहित शर्मासोबतच्या सारखेपणामुळे तो सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.





