Vaibhav Sooryavanshi Injury : भारत-पाक सामन्यात थरारक अपघात! सीमारेषेवर वैभव सूर्यवंशी अन् विप्रज निगमची जोरदार धडक, पाहा VIDEO
Vaibhav Sooryavanshi Injury : एशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ दरम्यान भारतीय स्टार वैभव सूर्यवंशी दुखापतीतून थोडक्यात बचावला. क्षेत्ररक्षण करताना त्याची सहकारी खेळाडू विप्रज निगमशी टक्कर झाली.

Vaibhav Sooryavanshi narrowly escapes serious injury : दोहा येथे सुरू असलेल्या ‘आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६’ च्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारत आणि पाकिस्तान-ए हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आले आहेत. या सामन्याच्या सुरुवातीच्या षटकांतच मैदानावर एक अत्यंत थरारक आणि भीतीदायक प्रसंग पाहायला मिळाला. एक चौकार वाचवण्याच्या प्रयत्नात भारताचे दोन युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी आणि विप्रज निगम सीमारेषेजवळ एकमेकांना जोरदार धडकले. या भीषण धडकेत अवघ्या १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी गंभीर दुखापतीपासून थोडक्यात बचावला.
तिसऱ्या षटकात घडला हा धक्कादायक प्रकार –
या सामन्यात पाकिस्तान-ए चा कर्णधार अब्दुल समदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शामिल हुसैनने संघाला वेगवान सुरुवात करून दिली, तर दुसऱ्या बाजूने माझ सदाकत फलंदाजी करत होता. ही संपूर्ण घटना पाकिस्तानच्या डावातील तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर घडली. भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या चेंडूवर माझ सदाकतने ऑन-साइडच्या दिशेने जोरदार फटका मारला आणि चेंडू स्क्वेअर लेगवरून वेगाने सीमारेषेकडे निघाला.
डायव्ह मारताना विप्रजचा पाय थेट वैभवच्या डोक्याला लागला –
🔴VIPRAJ NIGAM, WHAT WERE YOU TRYING TO DO WITH VAIBHAV SURYAVANSHI? 🤯
– Vaibhav ran to save the ball from going over the boundary.
– But Vipraj Nigam dived to stop the ball, and his leg hit Vaibhav’s head during the dive.HOPEFULLY, VAIBHAV HASN’T SUFFERED ANY INJURY. 👀 https://t.co/UH8SYnF8IR
— Sam (@cricsam02) November 22, 2026
चेंडू सीमारेषेपार जाण्यापासून रोखण्यासाठी स्क्वेअर लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर तैनात असलेले वैभव सूर्यवंशी आणि विप्रज निगम वेगाने चेंडूच्या मागे धावले. सीमारेषेच्या अगदी जवळ पोहोचताच चेंडू अडवण्यासाठी विप्रज निगमने हवेत सूर मारला. मात्र, याच दरम्यान त्याचा पाय थेट धावत असलेल्या वैभव सूर्यवंशीच्या डोक्याला जोरात लागला आणि दोघेही एकमेकांवर आदळले. या जोरदार धडकेमुळे मैदानावर उपस्थित असलेल्या सर्वांचीच चिंता वाढली.
वेदनेने कळवळला वैभव, पण मोठी दुखापत टळली –
ही धडक इतकी भीषण होती की, १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी वेदनेने कळवळून लगेचच आपला खांदा पकडून मैदानावर बसला. सुरुवातीच्या काही क्षणांत ही दुखापत अत्यंत गंभीर वाटल्याने भारतीय गोटात आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे काही सेकंदांतच वैभव सावरला आणि त्याने पुन्हा क्षेत्ररक्षण सुरू केले. तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे पाहून भारतीय संघाने सुटकेचा निःश्वास सोडला.





