GG vs UPW : गुजरात जायंट्सचा ऐतिहासिक श्रीगणेशा! तीन वर्षांचा वनवास संपला; यूपी वॉरियर्सची झुंज अपयशी

GG vs UPW Gujarat Giants beat UP Warriorz in WPL 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ च्या दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सने विजयाची नोंद करत स्पर्धेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या हाय-स्कोअरिंग सामन्यात गुजरातने यूपी वॉरियर्सचा १० धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे, डब्लूपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच गुजरात जायंट्सने हंगामातील पहिला सामना जिंकण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वीच्या तिन्ही मोसमांत त्यांना सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
गुजरातच्या फलंदाजांचा धुमाकूळ; उभारला धावांचा डोंगर
यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र गुजरातच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. गुजरातने २० षटकांत ४ बाद २०७ धावांचा डोंगर उभा केला. सोफी डिव्हाईनने २० चेंडूत ३८ धावांची वेगवान सुरुवात करून दिली. त्यानंतर अनुष्का शर्माने ३० चेंडूत ४४ धावांची संयमी आणि दमदार खेळी केली.
End of a high-scoring contest in Navi Mumbai! @Giant_Cricket 🧡 kick-off their #TATAWPL 2026 campaign with a 🔟-run victory over #UPW
Scorecard ▶️ https://t.co/0Vl9vFyTyq#KhelEmotionKa | #UPWvGG pic.twitter.com/TUpevakZ6v
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 10, 2026
तसेच कर्णधार अॅश्ले गार्डनरने ४१ चेंडूत ६५ धावांची दमदार कर्णधार खेळी करत संघाला २०० पार नेले. त्यानंतर राहिलेली कसर जॉर्जिया वेअरहॅमने भरुन काढली. तिने अवघ्या १० चेंडूत २७ धावांचे योगदान दिले. ज्यामुळे गुजरात जायंट्सला ४ बाद २०७ धावांचा डोंगर उभारता आला. यूपी वॉरियर्सकडून सोफी एक्लेस्टनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या, तर शिखा पांडे आणि डिएंड्रा डॉटिनने प्रत्येकी १ विकेट्स घेतली.
हेही वाचा – Jemimah Gavaskar Song : ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…’; गावस्करांनी पाळला जेमिमाला दिलेला शब्द! पाहा VIDEO
फीबी लिचफिल्डची एकाकी झुंज ठरली व्यर्थ –
२०८ धावांच्या अवाढव्य लक्ष्याचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सची सुरुवात खराब झाली. अवघ्या ३ धावांवर त्यांची पहिली विकेट पडली. त्यानंतर मेग लॅनिंग आणि फीबी लिचफिल्ड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. लॅनिंग बाद झाल्यानंतर धावगती राखण्याचे आव्हान लिचफिल्डने एकहाती पेलले. लिचफिल्डने ४० चेंडूत ७८ धावांची तुफानी खेळी केली, मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने यूपीचा संघ २० षटकांत ८ बाद १९७ धावांपर्यंतच मजल मारू शकला.





