RISHABH PANT IPL 2024 :- अपघातातून सावरलेला भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पुढील वर्षी होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत खेळणार असल्याचे संकेत त्याच्या दिल्ली कॅपिटल्स संघाने दिले आहेत. तो संपूर्ण मोसमासाठी उपलब्ध होणार का, तसेच संघात परतल्यावर तोच नेतृत्व करणार का असे प्रश्न सध्या निर्माण होत असले तरीही सध्या तरी पंत इम्पॅक्ट प्लेअर म्हणूनच संघाशी जोडला जाइल, असे मत दिल्ली कॅपिटल्सच्या संघ व्यवस्थापनाने दिले आहेत.
पंत सध्या आपल्या तंदुरुस्तीवर भर देत आहे, कठोर मेहनतही करत आहे. मात्र, अजून काही काळ तरी तो मॅचफिट असेल का याबाबत संभ्रम आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) त्याच्या बाबत अद्याप काहीही स्पष्ट सांगितलेले नाही. मात्र, त्याचे यष्टीमागे सराव करतानाचे व्हीडीओ पंतने स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे ही चर्चा सुरु झाली. असे असले तरीही खुद्द पंतने पुढील काही काळ आपण यष्टीरक्षक म्हणून कीतपत खेळू शकू असे सांगितल्यामुळे दिल्ली संघ त्याचा संघात समावेश इम्पॅक्ट प्लेअर म्हणजेच केवळ फलंदाज किंवा गोलंदाज अशाच स्तरावर करु शकतो. त्यात पंत फलंदाज असल्याने त्याला केवळ फलंदाज म्हणूनच खेळवण्याकडे दिल्लीचा कल दिसत आहे.
गेल्या वर्षी स्वतः कार चालवत आपल्या घरी निघालेल्या पंतचा अपघात झाला होता. त्यानंतर तो गंभीर दुखापतींनाही सामोरा गेला होता. त्याच्यावर शस्त्रक्रीयाही करण्यात आली होती. यातून सावरताना त्याने एनसीएमध्येही बराच काळ व्यतीत केला. आता तो सराव करण्यास उत्सूक असला तरीही त्याला मॅचफिट होण्यासाठी आणखी काही काळ गरजेचा आहे.
मात्र, जो पर्यंत तो मॅचफिट होणार नाही तोपर्यंत एनसीएकडून बीसीसीआयला कोणताही संपर्क साधला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. जर तो यष्टीरक्षक करणार नसेल व इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात दाखल होणार असेल तर त्याचे स्वागतच करु असेही दिल्ली कॅपिटल्स संघाने म्हटले आहे.