IND W vs AUS W : ऑस्ट्रेलियाने ३ दिवसांतच उडवला भारताचा धुव्वा! स्मृती-शेफाली पुन्हा एकदा ठरल्या फ्लॉप
IND W vs AUS W : ऑस्ट्रेलियाने हा सामना तिसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात १० विकेट्सनी जिंकून मल्टी-फॉर्मेट मालिका ५-२ ने आपल्या नावावर केली.

IND W vs AUS W Multi-format Series 2026 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला आहे. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना तिसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात १० विकेट्सनी जिंकून मल्टी-फॉर्मेट मालिका ५-२ ने आपल्या नावावर केली.
भारतीय फलंदाजीची दयनीय अवस्था –
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या सत्रापासूनच भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण केला. पहिल्या डावात भारत केवळ १९८ धावांत गारद झाला. जेमिमा रॉड्रिग्सने अर्धशतक झळकावून एकाकी झुंज दिली, पण इतर फलंदाजांनी तिला साथ दिली नाही. ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडने ४ गडी बाद करत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले.
अॅनाबेल सदरलँडची अष्टपैलू कामगिरी –
Australia win the Pink-Ball Test by 10 wickets.
With that, the multi-format series comes to an end.
Scorecard ▶️ https://t.co/60dR7l123m#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/AtBWo9mvG7
— BCCI Women (@BCCIWomen) March 8, 2026
गोलंदाजीनंतर फलंदाजीमध्येही अॅनाबेल सदरलँडने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. तिने १२९ धावांची शतकी खेळी साकारली. तिला एलिस पेरीची (७६ धावा) उत्तम साथ लाभली. या खेळीदरम्यान एलिस पेरी ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला फलंदाज ठरली. भारताकडून पदार्पण करणाऱ्या सयाली सातघरेने ४ विकेट्स घेतल्या, मात्र ऑस्ट्रेलियाला ३२३ धावांपर्यंत पोहोचण्यापासून ती रोखू शकली नाही.
दुसऱ्या डावातही शरणागती –
१२५ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या डावातही सावरता आले नाही. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा लवकर बाद झाल्या. पदार्पण करणाऱ्या लुसी हॅमिल्टन आणि सदरलँडने भारताची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली. प्रतिका रावलच्या ६३ धावांच्या झुंजार खेळीमुळे भारताने १४९ धावांपर्यंत मजल मारली आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघ्या २५ धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य ४.३ षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियाने ५-२ ने जिंकली मालिका –
ही मल्टी-फॉर्मेट मालिका होती, ज्यामध्ये ३ टी-२०, ३ वनडे आणि १ कसोटीचा समावेश होता. भारताने टी-२० मालिका २-१ अशी जिंकून चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन करत वनडे मालिका ३-० ने जिंकली आणि आता कसोटीत विजय मिळवून संपूर्ण मालिका ५-२ अशा फरकाने खिशात घातली.





