ICC Trophy Comparison : टीम इंडिया ‘वर्ल्ड चॅम्पियन’ बनूनही कांगारूंच्या मागेच! कोणाकडे अन् किती आहेत ICC ट्रॉफी? जाणून घ्या आकडेवारी
ICC Trophy Comparison : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नुकताच टी-२० विश्वचषक जिंकला असला, तरी ऑस्ट्रेलियाची बरोबरी करण्यासाठी भारताला अजून थोडा पल्ला गाठायचा आहे.

IND vs AUS ICC Trophy Comparison : जागतिक क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन असे संघ आहेत, ज्यांचे वर्चस्व निर्विवाद मानले जाते. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नुकताच टी-२० विश्वचषक जिंकला असला, तरी ऑस्ट्रेलियाची बरोबरी करण्यासाठी भारताला अजून थोडा पल्ला गाठायचा आहे. आतापर्यंतच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने १० आयसीसी खिताब जिंकले आहेत, तर भारतीय संघाच्या खात्यात ८ ट्रॉफी जमा झाल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया १० ट्रॉफींसह ‘अव्वल’ –
कांगारूंचा संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नेहमीच वरचढ राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ६ वेळा एकदिवसीय विश्वचषक (१९८७, १९९९, २००३, २००७, २०१५ आणि २०२३) जिंकला आहे. याशिवाय त्यांनी २०२१ मध्ये टी-२० विश्वचषक, २०२३ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) आणि २००६ व २००९ मध्ये सलग दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे.
टीम इंडियाचा ८ ट्रॉफींचा यशस्वी प्रवास –
— BCCI (@BCCI) March 8, 2026
भारताने आपली पहिली आयसीसी ट्रॉफी १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकली होती, तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे एकही खिताब नव्हता. भारताने आतापर्यंत २ वेळा वनडे विश्वचषक (१९८३, २०११) आणि विक्रमी ३ वेळा टी-२० विश्वचषक (२००७, २०२४ आणि २०२६) जिंकला आहे. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताचा रेकॉर्ड चांगला असून संघाने ३ वेळा (२००२, २०१३ आणि २०२५) हे जेतेपद पटकावले आहे. भारताला अजूनही जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (WTC) गदेची प्रतीक्षा आहे.
भारत लवकरच ऑस्ट्रेलियाला मागे टाकणार?
सध्याची टीम इंडियाची लय पाहता येत्या दोन-तीन वर्षांत भारत ऑस्ट्रेलियाला मागे टाकू शकतो, असा विश्वास क्रिकेट तज्ज्ञांना वाटत आहे. ऑस्ट्रेलियाचा फॉर्म सध्या काहीसा खालावलेला दिसत आहे, तर भारतीय संघाने २०२४ पासून सलग आयसीसी स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजवले आहे.





