नवी दिल्ली – पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका महामार्गावरील सुरक्षेतील त्रुटीवरून जोरदार राजकीय वाद सुरू आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांना भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच घेराव घातला. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते आंदोलकांना मागे हटवण्याच्या प्रयत्नात “मोदी जिंदाबाद” च्या घोषणा देताना दिसत आहेत. ओपी सोनी अमृतसरला जात असताना पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींचा निषेध करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी थांबवली आणि घेराव घातला होता.
सोनी यांच्या गाडीला घेराव घालत भाजप कार्यकर्ते ‘जय श्री राम’च्या घोषणा देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर, सोनी कारमधून उतरताना आणि “मोदी झिंदाबाद” च्या घोषणा देताना दिसत आहे, त्यानंतर आंदोलकांनी त्यांना जाऊ दिले. फेब्रुवारी-मार्चमध्ये पंजाब निवडणुकांपूर्वी पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींवरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
दरम्यान, पीएम मोदी पंजाबमधील फिरोजपूरमध्ये निवडणूक रॅलीसाठी जात असताना त्यांचा ताफा फ्लायओव्हरवर अडकला. आंदोलकांनी तेथे रास्ता रोको केला होता, त्यामुळे तेथे 20 मिनिटे थांबून पंतप्रधान मोदींना आपली सभा रद्द करून परतावे लागले. या घटनेनंतर केंद्र सरकारने पंजाबमधील काँग्रेस सरकारवर पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक केल्याचा आरोप केला आहे.