पुणे – दीपावली म्हणजे हरतऱ्हेची खरेदी. त्यामुळे साहजिकच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि दिवाळीचा “फील’ येण्यासाठी शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ताभर विद्युत रोषणाईचे तोरण लावण्यात आले आहे.
या अनोख्या उपक्रमासाठी सर्व व्यापारी बांधवांनी एकत्रित येत हा उपक्रम राबवला आहे. लक्ष्मी रस्त्यावर समाधान चौकापासून ते चित्रशाळा चौकापर्यंत संपूर्ण रस्त्यावर आणि कुमठेकर रस्त्यावर विश्रामबाग पासून ते “तथास्तू’पर्यंत या माळा लावण्यात आल्या असून, त्याचे सौंदर्य म्हणजे “आकाशीचा गालिचा’च वाटावा असे दिसत आहे. एकाच रंगाच्या बल्बचा हा आकाशीचा गालिचा पाहिल्यावर तोंडातून सुखद उद्गार निघाले नाहीत तरच नवल !
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारी मंडळी दरवर्षी नव्या शक्कली लढवत असतात. त्यामध्ये प्रत्येकजण स्वत:पुरती सजावट, ऑफर्स, सोडत अशी अनेक गोष्टी करतात. सराफा बाजारातही घडणावळीवर सूट, चांदी फ्री वगैरे ऑफर्स दिल्या जातात. हे वैयक्तिक पातळीवर असते. परंतु यंदा व्यापाऱ्यांनी त्याहीपेक्षा वेगळा उपक्रम राबवत अख्खा लक्ष्मी रस्ता आणि कुमठेकर रस्ताच विद्युत रोषणाईने उजळून टाकला आहे.
“पूर्वी खरेदीसाठी शहरातील आणि ग्रामीण भागातून लोक लक्ष्मी रस्त्यावरच येत होते. यात प्रामुख्याने दागिने, साड्या, ड्रेस यांची दुकाने याच रस्त्यांवरच आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत लक्ष्मी रस्ता आणि कुमठेकर रस्त्यावर पार्किंगची समस्या खूप मोठी झाली आहे. त्याच कारणामुळे ग्राहकांची संख्या काही प्रमाणात कमी झाली होती. ते वैभव परत आणण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी मिळून “कॉन्ट्रिब्युशन’ करून या ग्राहकांच्या “वेलकम’ची तयारी केली आहे.” – फत्तेचंद रांका, अध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ