Virat Kohli Mimicry : मैदानात पुन्हा एकदा ‘विराट’ मस्ती! अर्शदीप सिंगच्या रन-अपची नक्कल करतानाचा VIDEO व्हायरल

Virat Kohli Mimicry Arshdeep Singh run up : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा थरार उद्या, ११ जानेवारीपासून वडोदरा येथे सुरू होत आहे. या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू मैदानावर घाम गाळत असले, तरी सराव सत्रात खेळाडूंचा हलकाफुलका अंदाजही पाहायला मिळत आहे. विशेषतः विराट कोहलीने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या रनअपची केलेली हुबेहूब नक्कल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
मैदानावर पिकला एकच हशा!
नेट्समध्ये सराव सुरू असताना विराट कोहली रनिंग ड्रील्स करत होता. यावेळी तिथे अर्शदीप सिंग देखील उपस्थित होता. अर्शदीप आपली रनिंग पूर्ण करून विराटच्या जवळ पोहोचला, तेव्हा विराटने अचानक अर्शदीपच्या बॉलिंग रनअपची हूबहू नक्कल करत धावण्यास सुरुवात केली.
Virat Kohli is mimicking Arshdeep Singh’s running style 😂❤️ pic.twitter.com/RbobLlmn5S
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) January 9, 2026
विराटचा हा मजेशीर अंदाज पाहून तिथे उपस्थित असलेला कर्णधार रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंना आपले हसू आवरता आले नाही. स्वतः विराटही आपला हा ‘अवतार’ पाहून खळखळून हसताना दिसला. चाहत्यांना विराटचा हा मस्तीखोर स्वभाव खूप आवडला असून हा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला आहे.
हेही वाचा – Shreyas Iyer Attack : कुत्र्याला कुरवाळणं श्रेयस अय्यरला पडलं असतं महागात; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा –
न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत चाहत्यांचे डोळे विराट कोहलीच्या कामगिरीवर खिळले आहेत. विराटने २०२५ च्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत जबरदस्त फॉर्म दाखवला होता. त्या मालिकेत त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावून आपण अद्यापही ‘किंग’ असल्याचे सिद्ध केले होते. तोच फॉर्म तो न्यूझीलंडविरुद्ध कायम राखणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
२०२७ वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाची मालिका –
भारतीय संघासाठी ही वनडे मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी बीसीसीआय आतापासूनच चाचपणी करत आहे. या मालिके नंतर भारतीय संघ दीर्घ काळ वनडे क्रिकेट खेळणार नाही, त्यामुळे या मालिकेत विजय मिळवून वर्षाची शानदार सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा मानस आहे.





