IND W vs NZ W : ‘हा विजय आमच्यासाठी निश्चित सोपा नव्हता…’, न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर हरमनप्रीत कौरची प्रतिक्रिया

Harmanpreet Kaur praised Indian team : उपकर्णधार व सलामीवीर स्मृती मंधाना (109) व प्रतिका रावल (122) यांनी केलेल्या दमदार शतकांच्या व नंतर गोलंदाजांनी केलेल्या अचुक गोलंदाजीमुळे भारतीय महिला संघाने न्यूझीलंडला डकवर्थ-लुईस नियमानूसार 53 धावांनी नमविताना, स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. यामध्ये मध्यल्या फळीतील जेमिमाह रॉड्रिग्सने देखील 76 धावांची उपयुक्त खेळी करताना संघाच्या विजयात हातभार लावला. आम्ही ज्या प्रकारे खेळलो, त्यामुळे विजयाचे श्रेय हे सर्व संघाचे असल्याचे मत भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केले.
संपूर्ण श्रेय संघाला जाते –
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकांत 3 बाद 340 धावा केल्या. यामध्ये सलामीवीर प्रतिका आणि स्मृती यांनी दमदार शतके तर जेमिमाहने दमदार अर्धशतकी खेळी केली. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 44 षटकांमध्ये 8 बाद 271 धावांवर मर्यादित राहिला. भारतीय संघाने डीएलएस नियमानूसार ही लढत जिंकली. लढतीनंतर बोलताना कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, हा विजय आमच्यासाठी निश्चित सोपा विजय नव्हता. आम्ही ज्या प्रकारे खेळलो त्याचे संपूर्ण श्रेय संघाला जाते. हा सामना आमच्यासाठी किती महत्त्वाचा होता, याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच संघातील सर्व सहकार्यांनी दमदार खेळ केला. त्यामुळे सामना जिंकल्याचा निश्चितच आनंद असल्याचे कौर म्हणाली.
जेमिमाहने अपेक्षा पूर्ण केली –
ती पुढे म्हणाली की, स्मृती व प्रतिकाने जबाबदारीने फलंदाजी केली. त्यामुळे आमची सुरुवात चांगली झाली. दोघींनी संघाला जेव्हा 200 धावांचा टप्पा गाठून दिला, त्यावेळेसच आम्ही जेमिमाह रॉड्रिग्सला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. तिच्याकडून ज्या खेळीची अपेक्षा होती, तशाच प्रकारची खेळी तिने करताना, संघाला 300 धावांचा टप्पा गाठून दिला, असे म्हणताना तिने आघाडीच्या फलंदाजांचे कौतुक केले. घरच्या मैदानावर खेळताना, सर्वांच्या अपेक्षा चांगला खेळ करावा अशा असतात. प्रेक्षक आमच्या खेळाला भरभरुन प्रोत्साहन देतात. त्यामुळे या गोष्टीचा दबाव येतो, मात्र हा क्षण दबावाचा नसून त्या गोष्टीचा आनंद घेण्याचा असतो. त्यामुळे प्रेक्षकांचा पाठिंबा व खेळाडूंनी केलेला दमदार खेळ नक्कीच मनाला आनंद देणारा होता, असे देखील कौर म्हणाली.
आजच ती वेळ होती…
भारतीय संघाला द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या तिन्ही संघांकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघासाठी ही लढत जिंकणे महत्त्वाचे होते. एखादा पराभव देखील भारताचे स्पर्धेतील आव्हान संपवणार ठरू शकला असता. तीन पराभवानंतर हा विजय सोपा नव्हता. संघातील प्रत्येक खेळाडूने मैदानावर चिकाटी दाखवली. एकमेकांना सकारात्मक राहून प्रोत्साहन दिले. गेल्या तीन पराभवानंतर आज ती वेळ होती, ज्यावेळी आम्ही परिस्थिती बदलणार होतो. संघांने एकरुपता दाखवली आणि आम्हाला विजयावर शिक्कामोर्तब करता आले, अशी भावना देखील हरमनप्रीतने बोलून दाखविली. रविवारी न्यूझीलंड संघाचा पराभव झाल्याने, त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.





