मुंबई: भारतीय शेअर बाजारातील दिग्गज पोर्टफोलिओ मॅनेजर आणि ‘मल्टीबॅगर’ शेअर्स शोधण्यात हातखंडा असलेले तज्ज्ञ सिद्धार्थ भैया (वय ४७) यांचे ३१ डिसेंबर रोजी न्यूझीलंडमध्ये हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ते आपल्या कुटुंबासह न्यूझीलंडला गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या निधनामुळे देशातील गुंतवणूक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून शोक व्यक्त केला जात आहे. ‘एक्विटास’च्या माध्यमातून ७,७०० कोटींचे साम्राज्य सिद्धार्थ भैया हे Aequitas Investment Consultancy या नामांकित कंपनीचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) होते. आपल्या अफाट कौशल्याच्या जोरावर त्यांनी एका छोट्या फर्मचे रूपांतर एका मोठ्या एसेट मॅनेजमेंट कंपनीत केले. जानेवारी २०२६ पर्यंत त्यांच्या कंपनीचे ‘एसेट अंडर मॅनेजमेंट’ (AUM) सुमारे ७,७०० कोटी रुपयांवर पोहोचले होते. प्रामुख्याने अति-श्रीमंत (Ultra-HNI) गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करण्यासाठी ते ओळखले जात. बाजारातील ‘बबल’बद्दल दिला होता इशारा सिद्धार्थ भैया हे केवळ गुंतवणूकदार नव्हते, तर ते शेअर बाजाराचे परखड विश्लेषक होते. अलीकडेच त्यांनी भारतीय शेअर बाजारातील तेजीवर कडक शब्दांत टिप्पणी केली होती. सध्याची परिस्थिती ही ‘हेल्दी बुल रन’ नसून ती ‘एपिक प्रोपोर्शन्सचा बबल’ (महाफुगा) असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या मते, निफ्टीचा पीई (P/E) रेशो वरवर आकर्षक वाटत असला तरी, मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील व्हॅल्युएशन धोक्याच्या पातळीवर आहे. SIP बाबतचे त्यांचे विधान ठरले होते चर्चेचा विषय सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या SIP (Systematic Investment Plan) बाबत त्यांनी दिलेला ‘SWT’ (Systematic Wealth Transfer) हा शब्द प्रचंड गाजला होता. मध्यमवर्गीयांचा कष्टाचा पैसा SIP च्या माध्यमातून प्रमोटर्सच्या खिशात जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. दिग्गज गुंतवणूकदारांकडून श्रद्धांजली – सिद्धार्थ भैया यांच्या निधनानंतर गुंतवणूक क्षेत्रातील अनेक नामवंतांनी शोक व्यक्त केला आहे. ‘हेलिओस कॅपिटल’चे संस्थापक समीर अरोरा यांच्यासह अनेक बाजार तज्ज्ञांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या कामात शिस्त, बौद्धिक प्रामाणिकपणा आणि दीर्घकालीन दृष्टीकोन बाळगणारा एक ‘संस्था निर्माता’ हरपल्याची भावना ‘एक्विटास’ कंपनीने आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे.