Shreyas Iyer Attack : कुत्र्याला कुरवाळणं श्रेयस अय्यरला पडलं असतं महागात; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Shreyas Iyer Attack by Dog : श्रेयस अय्यर दुखापतीमुळे अडीच महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या बरगडील गंभीर दुखापत झाली होती. आता न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी वडोदऱ्यात दाखल होण्यापूर्वी श्रेयस अय्यर एका मोठ्या संकटातून थोडक्यात बचावला आहे. एका कुत्र्याला कुरवाळण्याचा प्रयत्न श्रेयसच्या चांगलाच अंगाशी आला असता, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
श्रेयस अय्यर वडोदऱ्यात आपल्या गाडीकडे जात असताना चाहत्यांनी त्याला गराडा घातला होता. आधी त्याने एका लहान मुलीला ऑटोग्राफ दिला आणि तो पुढे सरकला. तिथेच एका महिला चाहत्याच्या हातात पांढऱ्या रंगाचा एक लहान कुत्रा होता. “तुमचा मोठा फॅन तुम्हाला भेटायला आला आहे,” असे त्या महिलेने श्रेयसला सांगितले. स्वतःला श्वानप्रेमी समजणाऱ्या श्रेयसने प्रेमाने त्या कुत्र्याला कुरवाळण्यासाठी आपला हात पुढे केला.
View this post on Instagram
मात्र, त्याच क्षणी त्या कुत्र्याने श्रेयसच्या हातावर झडप घालून त्याला चावण्याचा प्रयत्न केला. श्रेयसने अत्यंत चपळाईने आपला हात मागे खेचल्यामुळे थोडक्याक बचावला. कुत्र्याचा हा आक्रमक पवित्रा पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वच जण थक्क झाले. सुदैवाने, श्रेयसने या घटनेवर राग व्यक्त न करता हसत हसत तिथून काढता पाय घेतला.
पुनरागमन पुन्हा लांबणीवर पडलं असतं!
श्रेयस अय्यरसाठी हा प्रसंग अत्यंत गंभीर ठरू शकला असता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एक उत्कृष्ट कॅच घेताना श्रेयस गंभीर जखमी झाला होता, ज्यामुळे त्याला अडीच महिने संघातून बाहेर राहावे लागले. आता कुठे तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून संघात परतला आहे. जर या घटनेत त्याला दुखापत झाली असती, तर त्याचे भारतीय संघातील पुनरागमन पुन्हा एकदा लांबणीवर पडले असते.
हेही वाचा – MI vs RCB : पहिल्याच सामन्यात आरसीबीची विजयी सलामी! डी क्लार्कच्या ‘मॅचविनिंग’ खेळीने मुंबईचा उडवला धुव्वा
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत श्रेयसवर मोठी जबाबदारी –
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबत श्रेयस अय्यर देखील न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून श्रेयसकडे पाहिले जाते. आता या अपघातातून बचावलेला श्रेयस मैदानात आपल्या बॅटने कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





