Bangladesh Cricket Controversy : टी-२० विश्वचषक २०२६ च्या आयोजनावरून भारत आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. सुरक्षिततेचे कारण देत भारताऐवजी दुसऱ्या देशात सामने खेळवण्याची मागणी करणाऱ्या बांगलादेश बोर्डाने आता आपल्याच दिग्गज खेळाडूला ‘इंडियन एजंट’ ठरवले आहे. माजी कर्णधार तमीम इक्बाल याच्यावर बोर्डाच्या संचालकाने केलेल्या या खालच्या पातळीवरील टीकेमुळे बांगलादेश क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. नेमका वाद काय? बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारताकडे सुरक्षेचे कारण देत विश्वचषकाचे सामने त्रयस्थ ठिकाणी हलवण्याची विनंती आयसीसीकडे पत्राद्वारे केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी कर्णधार तमीम इक्बाल याने आपली भूमिका मांडली होती. तमीमने म्हटले होते की, “कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बोर्डाने आयसीसीकडून मिळणाऱ्या निधीचा (Finances) विचार करावा, अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.” तमीमचा हा सल्ला बोर्डाला रुचला नाही. तमीम इक्बालवर ‘इंडियन एजंट’चा शिक्का – तमीमच्या या विधानानंतर बीसीबीचे संचालक आणि वित्त समितीचे अध्यक्ष एम. नजमुल इस्लाम यांनी फेसबुक पोस्टद्वारे तमीमवर निशाणा साधला. त्यांनी तमीम इक्बालला थेट ‘इंडियन एजंट’ असे संबोधले. या पोस्टनंतर बांगलादेशी चाहते आणि खेळाडूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हेही वाचा – MI vs RCB : पहिल्याच सामन्यात आरसीबीची विजयी सलामी! डी क्लार्कच्या ‘मॅचविनिंग’ खेळीने मुंबईचा उडवला धुव्वा कर्णधार नजमुल हुसेन शांतोचा बोर्डाला घरचा आहेर – तमीमवर झालेल्या या वैयक्तिक टीकेनंतर बांगलादेशचा सध्याचा कसोटी कर्णधार नजमुल हुसेन शांतो आपल्या माजी कर्णधाराच्या समर्थनासाठी खंबीरपणे उभा राहिला आहे. शांतोने बोर्डाच्या संचालकावर टीका करताना म्हटले, “हे अत्यंत खेदजनक आहे. तमीम इक्बाल हा बांगलादेशचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे, त्याचा असा अपमान करणे चुकीचे आहे. क्रिकेट बोर्ड हे खेळाडूंचे ‘संरक्षक’ मानले जाते, पण त्यांच्याकडूनच असे विधान येणे अस्वीकार्य आहे.” शांतो पुढे म्हणाला, “आई-वडील आपल्या मुलांना सुधारायचे असेल तर ते घरात करतात, सर्वांसमोर त्यांचा अपमान करत नाहीत. ज्या संस्थेकडून आम्ही संरक्षणाची अपेक्षा करतो, तिथूनच अशी विधाने येणार असतील, तर ते सहन करणे कठीण आहे. एक खेळाडू म्हणून मी हा अपमान पूर्णपणे नाकारतो.” हेही वाचा – Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरचा पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक विक्रम! शफाली वर्माला मागे टाकत बनली नंबर-१ वर्ल्ड कपबाबत सस्पेन्स कायम – एकीकडे बांगलादेश बोर्ड भारताशी पंगा घेत आहे, तर दुसरीकडे अंतर्गत वादांमुळे त्यांचे क्रिकेट रसातळाला जात असल्याचे चित्र दिसत आहे. आयसीसीने आधीच बांगलादेशची विनंती फेटाळली असून त्यांना विश्वचषकासाठी भारतातच यावे लागेल, असे स्पष्ट केले आहे.