IND vs AUS : मॅथ्यू शॉर्टने गोळीच्या वेगाने मारला शॉट, पण मध्ये आला विराट, मागे झुकत घेतला जबरदस्त कॅच, पाहा VIDEO

विराटने कठीण झेल सहज पकडला –
यंदाच्या वनडे मालिकेत विराटची बॅट शांत असली, तरी त्याच्या क्षेत्ररक्षकातील कमाल कायम आहे. मॅथ्यू शॉर्टने दुसऱ्या वनडेत 74 धावांची शानदार खेळी केली होती. सिडनी तिसऱ्या सामन्यातही तो चांगलाच सेट झाला होता. 23व्या षटकात वॉशिंगटन सुंदरच्या गोलंदाजीवर शॉर्टने स्वीप शॉट खेळला. त्यावेळी स्क्वेअर लेग अंपायरजवळ क्षेत्ररक्षक करणाऱ्या विराटने मागे झुकत अचूक झेल घेतला. शॉर्टचा जोरदार शॉट असूनही विराटने आपल्या चपळाईने तो सहज पकडला.
कठीण झेलाची खासियत –
What a special catch that is from Virat Kohli ✨
Follow #AUSvIND: https://t.co/YH5IbBTdsc pic.twitter.com/EcAya9tviT
— cricket.com.au (@cricketcomau) October 25, 2025
पहिल्या दृष्टीक्षेपात विराटचा हा झेल सामान्य वाटला, परंतु चेंडूची गती आणि परिस्थिती पाहता हा झेल अत्यंत अवघड होता. स्क्वेअर लेग अंपायरच्या बराच पुढे उभे असलेल्या विराटकडे रिअॅक्शन देण्यासाठी फारच कमी वेळ होता. चेंडूचा वेगही खूप होता, ज्यामुळे हा झेल आणखी आव्हानात्मक बनला. झेल घेतल्यानंतर विराटच्या चेहऱ्यावरून चेंडूचा वेग आणि त्याची अचूकता स्पष्ट झाली. कोहलीच्या या शानदार झेलामुळे भारतीय संघाला सामन्यात महत्त्वाचे यश मिळाले आणि ऑस्ट्रेलियाच्या डावाला खीळ बसली.
मॅथ्यू शॉर्टची खेळी आली संपुष्टात –
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या मॅथ्यू शॉर्टने 41 चेंडूत 2 चौकारांसह 30 धावांची खेळी केली. मात्र, त्याचा एकदिवसीय कारकिर्दीतील प्रवास आतापर्यंत फारसा प्रभावी राहिलेला नाही. 18 सामन्यांत त्याने 24च्या सरासरीने केवळ 392 धावा केल्या आहेत. तरीही ऑस्ट्रेलिया संघाने त्याच्यावर विश्वास दाखवत सातत्याने संधी दिल्या आहेत. विशेष म्हणजे, तो सध्या स्टीव्ह स्मिथच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे.
हेही वाचा – IND vs AUS : संघ बदलला, कर्णधार बदलला, पण तरी संपेना साडेसाती! भारताने सलग १८व्यांदा केला ‘हा’ नकोसा विक्रम
सामन्याबद्दल बोलायचे तर तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 237 धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा संघ 46.4 षटकांत 236 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून मॅट रेनशॉने सर्वाधिक 56 धावांचे योगदान दिले. भारताचे गोलंदाजीचे नेतृत्व करताना गोलंदाज हर्षित राणाने चार विकेट्स घेतल्या. ज्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.





