India vs Australia ODI Series :- भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघांमधील बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेदरम्यान, दोन्ही देशांचे महिला क्रिकेट संघ गुरुवारपासून येथील ॲलन बॉर्डर मैदानावर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेत आमनेसामने असणार आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ खेळणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टिकोनातून या मालिकेला महत्व प्राप्त झाले आहे.
A look at #TeamIndia‘s ODI squad for the upcoming tour of Australia 👌👌#AUSvIND pic.twitter.com/q0LRy53sSD
— BCCI Women (@BCCIWomen) November 19, 2024
ऑक्टोबरमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय संघाने गेल्या महिन्यात घरच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा 2-1 असा पराभव केला होता. मात्र, आतापर्यंत येथे सोळापैकी केवळ चार एकदिवसीय सामने जिंकणाऱ्या भारतासाठी ऑस्ट्रेलियाचे आव्हान नेहमीच कठीण राहिले आहे. गेल्या वेळी 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाने येथे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव केला होता. गेल्या नऊ महिन्यांपासून या एकदिवसीय लढत न खेळलेला गतविजेता ऑस्ट्रेलिया पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी आत्मपरीक्षण करण्यासाठी उत्सुक असणार आहे.
भारताच्या फलंदाजीची मदार पुन्हा एकदा अनुभवी सलामीवीर स्मृती मंधानावर अवलंबून असणार आहे. स्मृतीने गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून भारताला विजय मिळवून दिला. भारताला दमदार सुरुवात करून देण्याची जबाबदारी स्मृतीवर असेल. तिने गेल्या सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये ७० पेक्षा अधिकच्या सरासरीने ४४८ धावा केल्या आहेत.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेली कर्णधार ॲलिसा हिलीची उणीव भासणार आहे. ही मालिका आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा एक भाग आहे, ज्यामध्ये अठरापैकी तेरा एकदिवसीय लढती जिंकून ऑस्ट्रेलिया सध्या पहिल्या स्थानावर आहे. हिलीच्या जागी क्वीन्सलँड आणि सिडनी थंडर्सची फलंदाज जॉर्जिया वोलला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू ताहलिया मॅकग्रा संघाचे नेतृत्व करेल, तिच्या कामगिरीवर बरेच काही अवलंबून असेल.
थोडी खुशी… थोडी चिंता…
महिला बिग बॅश लीगदरम्यान मेलबर्न स्टार्सकडून खेळताना मनगटाच्या दुखापतीमुळे त्रस्त झालेल्या यास्तीका भाटियाची यष्टिरक्षक-फलंदाज भारतीय संघाला उणीव भासणार आहे. तिच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेली युवा यष्टिरक्षक उमा छेत्रीला तिच्या पहिल्या एकदिवसीय मालिकेत छाप पाडण्यासाठी उत्सुक असणार आहे. खराब फॉर्मशी झगडत असलेल्या शेफाली वर्माला संघात स्थान मिळवता आलेले नाही.
कर्णधार हरमनप्रीत कौरचा फॉर्मही चर्चेचा विषय होता, तिला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय मालिकेत तिन्ही सामन्यांमध्ये दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोष, हरलीन देओल, तीतस साधू आणि मिन्नू मणी यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. भारतासाठी, दीप्ती शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 3.6 च्या सरासरीने गोलंदाजी केली आणि तिला ही कामगिरी सुरू ठेवायला आवडेल. न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण करणारी आक्रमक वेगवान गोलंदाज सायमा ठाकोरही आपल्या कामगिरीने छाप सोडण्यास उत्सुक असेल.
दोन्ही संघ :
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, उमा छेत्री, हरलीन देओल, ऋचा घोष, तेजल हसबनीस, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, प्रिया पुनिया, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, टिटास साधू, दीप्ती शर्मा, रेणुका सिंह ठाकूर, सायमा ठाकोर, राधा यादव.
ऑस्ट्रेलिया : ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), ऍशले गार्डनर, डार्सी ब्राउन, किम गर्थ, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, सोफी मोलिनौ, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शूट, ॲनाबेल सदरलँड, जॉर्जिया वॉल, जॉर्जिया वेरहॅम.