मुंबई – गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. नुकतेच शनिवारी पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाले आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील बालकार मायरा वायकुळच्या (Myra Vaikul) घरातील गणपती बाप्पाचे देखील विसर्जन झाले आहे. मात्र बाप्पाला निरोप देताना मायराला रडू कोसळल्याचे पाहायला मिळाले आहे. तिचा बाप्पाला निरोप देतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी मायरा बाप्पाच्या कानामध्ये काही तरी सांगत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर विसर्जन करण्यासाठी बाप्पाची मूर्ती घेऊन जाताना काही मुलं दिसतात. बाप्पाला निरोप देताना मायराला रडू आवरत नाही. मायराचे बाबा तिला समजावण्याचा प्रयत्न करतात पण मायरा ढसाढसा रडतच राहिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
इतकेच काय तर मायरा आपल्या लाडक्या बाप्पाला म्हणते की, ‘देवबाप्पा का रे सोडून गेला मला? रागावलास का माझ्यावर. खरं सांगू आता मला तुझी खूपच आठवण येईल. पुढच्या वर्षी मी तुला खूप खूप लाडू मोदक खायला देईल. पण तू लवकर ये. मी तुझी वाट बघतेय.’ तिच्या हे बोल ऐकून चाहतेही भावूक झाले आहेत.
View this post on Instagram
पर्पल मराठी या इन्स्टाग्राम पेजवरून मायरा वायकुळचा गणपती बाप्पाला निरोप देतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील बालकार मायरा वायकुळ घराघरात पोहचली. सध्या मायरा ‘निरजा एक नई पेहचान’ या हिंदी मालिकेत काम करत आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक गाण्यांवरील डान्स रिल्स तिचे चर्चेत असतात. तिच्या सुंदर अभिनयाने मायराने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे.