पुणे – आईसह मेट्रोची वाट पाहत थांबलेला ३ वर्षाचा मुलगा मेट्रो ट्रॅकवर पडल्याने त्याचा वाचविताना त्याची आईही ट्रॅकवर पडली. यावेळी उडालेल्या गोंधळात मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने प्रसांगावधान राखत मेट्रो स्थानकावरील आपातकालीन बटन दाबल्याने स्थानकापासून अवघ्या तीस मीटर अंतरावर मेट्रो थांबली. त्यामुळे या दोघांचाही जीव वाचला. विकास बांगर असे या सुरक्षकाचे नाव आहे. मेट्रो ट्रेन थांबल्यानंतर मुलगा व त्याच्या आईला सुखरूप रित्या रुळांवरून बाहेर काढण्यात आले व परिवाराशी त्याची भेट करून देण्यात आली. तर, महामेट्रोच्या वतीने बांगर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
असा घडला प्रकार
शुक्रवारी दुपारी २:२२ मिनिटांनी सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक येथे फलाट क्रमांक २ वरून एक 3 वर्षाचा मुलगा खेळताना रुळावर पडला. पडणाऱ्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलाची आई देखील रुळांवर पडली. मात्र, यावेळी या फालटावर येणारी मेट्रो स्टेशनपासून अवघ्या तीस मीटर अंतरावर होती. त्यामुळे स्थानकावरील नागरिकांचा गोंधळ उडाला. ही बाब निदर्शनास येताच प्रसांगावधान दाखवित सुरक्षा रक्षक विकास बांगर याने फलाटावरील आपत्कालीन मेट्रो थांबविण्याचे प्लंजर बटन वेळीच दाबले. त्यामुळे स्थानकाच्या दोन्ही दिशांनी वेगाने येणाऱ्या मेट्रो ट्रेन त्वरित थांबल्या यावेळी स्थानक आणि मेट्रो यामधील अंतर केवळ ३० मीटर इतके होते. त्यामुळे, अनेकांना समोरून येणारी मेट्रो आणि त्याच वेळी खाली पडलेले आई आणि मुलगा पाहून आरडा ओरडा केल्याने स्थानकावर मोठा गोंधळा उडाला होता.
Pune: सुरक्षाकाच्या सावधानतेने वाचले दोघांचे प्राण; सिव्हील कोर्ट मेट्रो स्थानकावरील प्रकार pic.twitter.com/oCkgtD7aNY
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) January 19, 2024
मुलांची काळजी गरजेची..
मेट्रोच्या विस्तारीत मार्गाची सेवा आॅगस्ट २०२३ पासून सुरू झाली असून नागरिकांकडून मेट्रो सेवेला चांगला प्रतिसाद दिला जात आहे. त्यामुळे अनेकदा नागरीक मुलांना घेऊन मेट्रोच्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी येत असून मेट्रो फालटावर येताना तसेच आल्यावर मुलांकडून अनेकदा आनंदाच्या भरात नियमांचे उल्लंघन केले जात आहे. अशा वेळी सोबत असलेल्या पालकांकडून मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, अनेकदा पालक फोटो काढणे, गप्पा मारणे यात व्यस्त असल्याने मुले फालटावर धोकादायकरित्या वावरत असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते.