पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – उद्या (बुधवारी) ठिकठिकाणी विज्ञान दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने शहरातील विविध विज्ञान संस्था, शिक्षण संस्थांतर्फे व्याख्याने, विज्ञान प्रदर्शन, शास्त्रज्ञांशी संवाद असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सर्व कार्यक्रम सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत होणार असून, कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहेत.
आघारकर संशोधन संस्थेत जैवऊर्जा, करंडक वनस्पती, बुरशी, औषधी आणि पीक वनस्पती, जीवाश्म आदींचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जैवतंत्रज्ञान, आर्किया आणि विषाणू, करंडक वनस्पती आणि पिकांच्या जाती या विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
आयसरमध्ये ज्येष्ठ सांख्यिकी भौतिकशास्त्रज्ञ डॉ. दीपक धर, अरविंद गुप्ता यांच्यासह संस्थेतील शास्त्रज्ञांची व्याख्याने होणार आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी वैज्ञानिक प्रकल्पांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.
त्याशिवाय मलेरियावरील लसीचा शोध, दैनंदिन विज्ञान, विश्वाचा सर्वांत छोटा तुकडा अशा विषयांवरील मार्गदर्शन सत्रे, प्रश्नमंजूषा असे उपक्रम होणार आहेत. इंद्राणी बालन सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये तयार केलेल्या अभिनव विज्ञान आणि गणित प्रतिकृती पाहता येणार आहेत.
सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुकात विविध दुर्बिणींची प्रारुपे पाहता येतील. आदित्य एल १ ही सौरमोहीम, सूर्य आणि सौरभौतिकी, गुरुत्वीय लहरी, कृष्णविवर आणि लायगो इंडिया, क्वांटम तंत्रज्ञान या विषयांवरील प्रात्यक्षिके, जितेंद्र जोशी यांचे सूर्यमंडळाचा प्रवास, स्वर्णिम शिर्के यांचे वैश्विक संग्रहालयाची भेट,
दिशा सावंत आणि अथर्व पाठक यांचे सिटिझन सायन्स, ए. एन. रामप्रकाश यांचे आपण आपल्या सूर्याला किती चांगले ओळखतो, अशी व्याख्याने, ॲस्ट्रो ट्रेजर हंटसारखे उपक्रमही होणार आहेत. त्याशिवाय ज्येष्ठ शास्त्रज्ञांशी प्रश्नोत्तरांद्वारे संवादही साधता येणार आहे.
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) सकाळी साडेदहा वाजता आयआयटी मुंबईतील डॉ. रुची आनंद यांचे व्याख्यान होणार आहे, तसेच विद्यार्थी, वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेत (एनसीसीएस) सकाळी साडेदहा वाजता पर्सिस्टंटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यांचे व्याख्यान होणार आहे. त्याशिवाय जैवतंत्रज्ञानातील अद्ययावत सुविधा, प्रयोगशाळा पाहण्यासाठी खुल्या असतील.
दरम्यान, पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्कमध्येही विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्यात शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, विज्ञान चित्रपट, शास्त्रज्ञांशी संवाद, प्रात्यक्षिके अशा उपक्रमांचा समावेश आहे. राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातर्फे (एनसीआरए) नारायणगावजवळच्या खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.