सातारा -सातारा शहर व परिसरात गुरुवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने जोरदार वाऱ्यांसह हजेरी लावली. तब्बल तासभर तुफान पावसाने सातारा शहर परिसराला धुवून काढले. लॉकडाऊनची कसरत सांभाळत व्यवसाय करणाऱ्या बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांची एकच धावपळ झाली.
सातारा शहर व परिसरात सायंकाळी चार वाजल्यापासून वातावरणात गारवा वाढला होता. सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरवात झाली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आडतदारांकडून शेतीमालांचे वाटप सुरू असताना जोरदार पावसाने भाजी विक्रेत्यांची धावपळ उडवून दिली. जिल्ह्यात शेतकऱ्याची मशागतीची कामे सुरु झाली आहेत. पावसाने आंबा उत्पादकांना मात्र फार मोठा फटका दिला आहे. पाऊस सुरु होताच शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता, रात्री उशिरापर्यंत तो सुरळीत झाला नाही.