Uddhav Thackeray meets Sharad Pawar – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात बिनसलं असल्याच्या चर्चा गेल्या दोन – तीन दिवसांपासून सुरु आहेत. शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांची केलेली पाठराखण, मोदींच्या पदवीवरून सुरु असलेल्या वादावर मांडलेली भूमिका तसेच अजित पवार यांनी शिवसेनेकडून एव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत असताना ईव्हीएमला दिलेली क्लीनचिट यांमुळे उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दुरावा वाढत चालल्याचे वृत्त होते.
अशातच आता खुद्द उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थान – सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत.
या मुद्द्यांवर होणार चर्चा?
अदानींबाबत शरद पवार यांनी घेतलेली भूमिका
राज्यात महाविकास आघाडीच्या छताखाली शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी व काँग्रेस हे पक्ष एकत्र आहेत. एकीकडे काँग्रेसने उद्योगपती अदानी यांच्यावर आरोप करत वातावरण तापवले असतानाच शरद पवार यांनी मात्र अदानींना क्लीनचिट दिली आहे. अशावेळी महाविकास आघाडी म्हणून काय भूमिका घ्यायची यावर चर्चा होऊ शकते.
मोदींची पदवी
विरोधकांनी मोदींच्या पदवीचा मुद्दा तापवलं असताना शरद पवार यांनी मात्र हा मुद्दे महत्वाचा नसल्याचे म्हंटले आहे. पवार यांच्या या भूमिकेमुळे मोदींच्या पदवीचा विषय लावून धरणाऱ्या मित्रपक्षांचा पुरता फज्जा उडालाय. पवार ठाकरे यांच्या भेटीत या मुद्द्यावर देखील चर्चा होऊ शकते.
ईव्हीएमवर भूमिका
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या ईव्हीएमबाबतच्या वक्तव्याला केराची टोपली दाखवली होती. तसेच आपला ईव्हीएम मशीनवर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी म्हंटले होते. दोन्ही मित्र पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांनी अशी विरोधाभासी वक्तव्य करणं पुढे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे हा मुद्दा देखील चर्चिला जाऊ शकतो.
फडतूस – काडतूस प्रकरण
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख फडतूस असा केला होता. तर फडणवीस यांनी आपण फडतूस नव्हे तर काडतूस असल्याचे प्रत्युत्तर दिले होते. या दोन्ही नेत्यांनी टीका करताना वापरलेल्या भाषेबाबत शरद पवार यांनी आक्षेप नोंदवला होता. याबाबतही आजच्या बिथकीत चर्चा होऊ शकते.
पवारांचा भाजपसोबत जाण्याचा प्लॅन?
नागालँडमध्ये भाजपला दिलेला पाठिंबा, सुप्रिया सुळेंकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक, शरद पवार यांच्याकडून अदानींना तर अजित पवार यांच्याकडून ईव्हीएम मशीनला क्लीनचिट यांमुळे राष्ट्रवादी व भाजपमध्ये काही शिजतंय काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अशातच उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्याने त्यांची ही भेट शरद पवारांच्या हालचाली नेमक्या कोणत्या दिशेने सुरु आहेत याची चाचपणी करण्यासाठी तर नाही ना अशीही चर्चा सुरु आहे.