नवी दिल्ली – भारतीय पत्रकार आणि टीव्ही चॅनलचे अँकर सुधीर चौधरी यांना अबुधाबी येथे होणाऱ्या चार्टर्ड अकाउंट्स कार्यक्रमातील पाहुण्यांच्या यादीतून वगळण्यात आलं. सुधीर चौधरी या कार्यक्रमात वक्ते म्हणून सामील होणार होते. मात्र युएईच्या राजकन्या हेंड बिंत-ए-फैसल अल कासिम यांनी चौधरी यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला.
राजकन्या हेंड बिंत-ए-फैसल अल कासिम यांनी सुधीर चौधरी यांना दहशतवादी म्हटलं. त्यानंतर आयोजकांनी चौधरी यांना कार्यक्रमातून हटविलं.
राजकन्या हेंड बिंत-ए-फैसल अल कासिम यांनी म्हटलं की, एक भारतीय अँकर सकाळ-संध्याकाळ मुस्लिमांचा अपमान करतो. या अँकरकडून ज्या देशाचा सतत अपमान करण्यात येतो, त्याचा सन्मान कऱण्यासाठी याच देशात बोलविण्यात आलं. दरम्यान कासिम यांनी इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडियाच्या वतीने एक पत्र ट्विट केलं. ज्यामध्ये सुधीर चौधरी यांना कार्यक्रमातील वक्त्यांच्या यादीतून वगळण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
Sudheer Chaudhary dropped from the panel of speakers at the Abu Dhabi Chartered Accountants. pic.twitter.com/jD6JZrd84W
— Hend F Q (@LadyVelvet_HFQ) November 21, 2021
कासिम यांनी आपल्या ट्विटमध्ये भारतीय पत्रकार सुधीर चौधरी यांच्यावर फेक न्यूज, इस्लामोफोबिया आणि धार्मिक मतभेद निर्माण करण्याचे आरोप लावले. तसेच अशा बेजबाबदार पत्रकाराला आपल्या देशातील मोठ्या मंचावर बोलवायला हवं, का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान सुधीर चौधरी भारतात इस्लामोफोबियासाठी परिचीत आहेत. तसेच भारतातील 200 दशलक्ष मुस्लिमांना लक्ष्य करतात. त्यांच्या प्राईमटाईम शोमुळे भारतात मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना प्रोत्साहित केलं आहे.
भारतीय पत्रकारांना कायमच परदेशात योग्य वागणूक मिळत नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे, बहुतांशी भारतीय पत्रकार सरकारला प्रश्न विचारण्याऐवजी सरकारचं गुणगान करण्यात धन्यता मानतात. या प्रत्येय आता सुधीर चौधरींना आला आहे. तर दुसरीकडे भारतीय पत्रकार असलेले रवीश कुमार यांना निष्पक्ष पत्रकारितेसाठी रेमन मॅगसेस पुरस्काराने सन्मानित कऱण्यात आलं आहे.