Maharashtra Politics : महायुतीत भूकंप? राष्ट्रवादीचे आमदार शिंदेसेनेच्या संपर्कात, शिरसाटांच्या दाव्याने खळबळ; शिंदेंनी दिली कडक समज
Maharashtra Politics : महायुतीमधील अंतर्गत वाद आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) कथित धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे.

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी वाढत असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. आधीच पक्षातील काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीतील काही आमदार शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत आणि राष्ट्रवादीत राजकीय खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics)
राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात
संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यानुसार, अजित पवार गटातील काही आमदारांमध्ये नेतृत्वाबाबत संभ्रम निर्माण झाला असून, कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं? असा प्रश्न त्यांना पडला आहे. काही लोक आमच्या संपर्कात असून चर्चा सुरू आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे अजित पवारांच्या पक्षात फूट पडण्याच्या चर्चांना अधिक खतपाणी मिळाले आहे. (Maharashtra Politics)
दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांबाबत वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. दिल्लीतील पक्ष कार्यालयातील जबाबदाऱ्यांवरूनही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, ती दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्याने पक्षात संभ्रमाचे वातावरण आणखी गडद झाल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Politics)
राष्ट्रवादीची 26 मे रोजी बैठक
पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी आता 26 मे रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती आहे. तसेच काही आमदार इतर पक्षांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
शिरसाट यांना कडक शब्दांत समज
संजय शिरसाट यांच्या विधानामुळे महायुतीत तणाव निर्माण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हस्तक्षेप केला. शिंदे यांनी शिरसाट यांना फोन करून कडक शब्दांत समज दिली असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीत फूट पडेल असे कोणतेही वक्तव्य करू नये आणि तिन्ही पक्षांना सोबत घेऊन सरकार चालवायचे आहे, असे स्पष्ट निर्देश शिंदेंनी दिल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Politics)
या प्रकरणावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संजय शिरसाट आमच्या पक्षाबद्दल वारंवार वक्तव्य कसे करू शकतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, यापुढे अशा प्रकारची वक्तव्ये झाल्यास थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू, असा इशाराही त्यांनी दिला. (Maharashtra Politics)





