राजगुरुनगर : श्रीक्षेत्र भीमाशंकर हे खेड तालुक्याच्या ओळखीचे, सांस्कृतिक परंपरेचे आणि धार्मिक अस्मितेचे प्रतीक असून, या पवित्र स्थळाच्या संदर्भात अलीकडे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे खेड तालुक्यातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासह भीमाशंकरच्या प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, जिल्हा परिषद माजी गटनेते शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, समीर सुपे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, सुरेश शिंदे यांच्यासह तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. श्रीक्षेत्र भीमाशंकर हे ऐतिहासिक, धार्मिक आणि प्रशासकीयदृष्ट्या खेड तालुक्याचाच अविभाज्य भाग राहिले असून, या प्रश्नावर स्वर्गीय नारायणराव पवार यांनी आयुष्यभर संघर्ष केला होता. भीमाशंकरची ओळख खेड तालुक्याशी कायम राहावी यासाठी अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनीही वेळोवेळी शासन दरबारी भूमिका मांडत खेड तालुक्याच्या अस्मितेचा मुद्दा अधोरेखित केला आहे. मात्र, अलीकडे झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत भीमाशंकर खेड-आंबेगाव असा उल्लेख करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खेड तालुक्यातील जनतेमध्ये नाराजी आणि चिंता व्यक्त होत आहे. शासनाच्या अधिकृत कार्यवृत्तात अशा प्रकारचा उल्लेख झाल्यास भविष्यात प्रशासकीय आणि भौगोलिक संदर्भ बदलण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे खेड तालुक्याच्या अस्मितेला धक्का बसू शकतो, अशी भावना निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने या विषयात संवेदनशीलता दाखवावी आणि श्रीक्षेत्र भीमाशंकरचा उल्लेख खेड तालुक्याशी संबंधितच कायम ठेवावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. भीमाशंकर हे केवळ धार्मिक स्थळ नसून खेड तालुक्याच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. यासोबतच खेड तालुक्याच्या विकासासाठी विविध प्रलंबित कामांकडेही लक्ष वेधण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेतरस्ते योजना, जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील विकासकामे, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती, नवीन शाळा वर्गखोल्या, अंगणवाडी इमारती, महावितरण अंतर्गत ट्रान्सफॉर्मर उभारणी तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत विविध विकासकामांचा समावेश असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि वीज यंत्रणा सक्षम झाल्यास खेड तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल. विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. भीमाशंकरसोबत आंबेगावचे शेपूट जोडू देणार नाही यापूर्वीदेखील भीमाशंकर आंबेगाव तालुक्यात समाविष्ट करण्याचे प्रयत्न झाले होते. त्या वेळीही खेड तालुक्यातील नेत्यांनी त्याला जोरदार विरोध केला होता. स्वर्गीय आमदार नारायण पवार यांच्यासह अनेकांनी भीमाशंकरच्या अस्मितेसाठी संघर्ष केला होता. मात्र काही लोक स्वार्थापोटी आणि भीमाशंकरच्या वाढत्या महत्त्वामुळे या विषयात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला. रस्ता तुमच्या बाजूने असू द्या, पण भीमाशंकर आमच्या खेड तालुक्यातलाच आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आंबेगावचे नाव जोडू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. श्रीक्षेत्र भीमाशंकर हे खेड तालुक्याच्या श्रद्धा, इतिहास आणि अस्मितेशी जोडलेले पवित्र स्थान आहे. या विषयावर कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही, यासाठी शासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी. तसेच खेड तालुक्याच्या विकासासाठी प्रलंबित कामांना गती देणे ही काळाची गरज आहे. -दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार हेही वाचा : Pune District : रांजणगाव गणपती-वाघाळे रस्त्याची चाळण