Top 10 News : महिनाभरापासून CSC सेंटर बंद ते पुढील वर्षीच्या पावसावरही एल निनोचं सावट..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या
Top 10 News : सर्वसामान्यांना मोठा धक्का ते पुढील वर्षीच्या पावसावरही एल निनोचं सावट..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : १) पुढील वर्षीच्या पावसावरही एल निनोचं सावट
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षाच्या पावसाबाबतही चिंता व्यक्त केली जातेय. राज्य सरकारने २६५ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ अंतर्गत दुष्काळ जाहीर केला असून, यामुळे राज्यातील सुमारे ७४ टक्के भाग दुष्काळग्रस्त ठरलाय. दरम्यान, एल निनोच्या संभाव्य प्रभावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका मांडलीय. एल निनोचा प्रभाव वाढला तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी सरकारला तयारी ठेवावी लागेल, असे त्यांनी म्हटले. फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, सध्याचा एल निनो फेब्रुवारीच्या आसपास शिखरावर जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज असून त्यानंतर त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही फडणवीस यांनी एल निनोच्या प्रभावाचा अंदाज घेऊन सरकारने चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी तयारी केल्याचे सांगितले होते. (Top 10 News)
२) त्यांनाही पोरं झाली ना? लग्नाच्या खर्चावर विखे पाटलांची मिश्कील टिप्पणी
राज्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यांमधील अनावश्यक डामडौल आणि खर्च टाळून साध्या पद्धतीने लग्न करण्याचे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कोरोना काळातील साध्या विवाहांचा दाखला देताना त्यांनी मिश्कील टिप्पणी केली. दहा लोकांमध्ये लग्न झाली, ५० लोकांमध्ये लग्न झाली. मात्र, त्यांना पोरं झाली नाहीत का? असा सवाल त्यांनी केला. मोठ्या खर्चाशिवायही विवाह होऊ शकतात, असे सांगत त्यांनी पुन्हा सामुदायिक विवाहाकडे वळण्याचे आवाहन केले. डामडौल बंद करा. परिस्थिती अडचणीची आहे, असेही ते म्हणाले. (Top 10 News)
३) बळीराजासाठी गजानन महाराज संस्थानचा मोठा निर्णय
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी मदत केलीय. संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय. यंदा कमी पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झालाय. अशा परिस्थितीत शासनाच्या मदतकार्याला हातभार लावण्यासाठी संस्थानने हा निधी दिला आहे. श्री गजानन महाराज संस्थानकडून यापूर्वीही नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत करण्यात आली आहे. २०१९ आणि २०२५ मध्येही संस्थानने आपत्तीग्रस्तांसाठी सहायता निधी दिलाय. (Top 10 News)
४) ५३ तोळे सोनं, २ किलो चांदी अन् साडेपाच लाखांची रोकड लंपास
बीडच्या अंबाजोगाई शहरातील बंद घर फोडून ५३ तोळे सोनं, पावणेदोन किलो चांदी आणि साडेपाच लाखांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आलीय. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी परिसरातून दोन संशयित आरोपींना अटक केलीय. पोलिसांच्या माहितीनुसार, अमर थोरात, जगजितसिंग दुधानी आणि फरार मंगलसिंग बावरी यांनी घराची रेकी करून चोरी केल्याचा आरोप आहे. चोरीनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी हातमोजे, कपडे आणि घरातील सीसीटीव्हीचा DVR तलावातील घाण पाण्यात फेकल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यानंतर स्थानिक गोताखोरांच्या मदतीने तलावातून DVR बाहेर काढण्यात आला. अटक आरोपींकडून २७ तोळे सोनं आणि ८५८ ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली असून, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. (Top 10 News)
५) RNO : तीन वर्षांचा नवस पूर्ण; दत्तात्रय भरणेंनी कार्यकर्त्याच्या पायात घातली कोल्हापुरी चप्पल
इंदापूर तालुक्यातील पडस्थळ येथील विश्वजीत मारकड यांनी गेल्या तीन वर्षांपासून पायात चप्पल न घालण्याचा नवस केला होता. इंदापूरचे लोकप्रतिनिधी म्हणून दत्तात्रय भरणे यांनी तिसऱ्यांदा आमदार व्हावे आणि शेतकरी पुत्र म्हणून त्यांची कृषिमंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी लागावी, अशी त्यांची इच्छा होती. अखेर भरणे आमदार झाले आणि त्यांची कृषिमंत्री म्हणूनही निवड झाली. नवस पूर्ण झाल्यानंतर भरणेवाडी येथील निवासस्थानी दत्तात्रय भरणे यांनी विश्वजीत मारकड यांचा सत्कार केला. यावेळी भरणे यांनी स्वतः विश्वजीत यांच्या पायात कोल्हापुरी चप्पल घातली आणि त्यांना चप्पल भेट दिली. हा भावनिक क्षण पाहून विश्वजीत मारकड यांना अश्रू अनावर झाले. या प्रसंगाची परिसरात चर्चा होत आहे. (Top 10 News)
६) RNO : राहुल गांधींसह ठाकरे बंधूंवर ज्योती वाघमारेंचा हल्लाबोल; SIR मुद्द्यावरून विरोधकांना घेरलं
निवडणूक आयोग आणि विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIRच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी राहुल गांधींसह ठाकरे बंधूंवर टीका केलीय. विरोधकांकडून ‘फेक नॅरेटिव्ह’च्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. निवडणूक आयोग ही संविधानिक संस्था असून, आयोगाच्या भूमिकेचा आधार घेऊन वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांनी SIRच्या मुद्द्यावर कटकारस्थानाचे आरोप करण्याऐवजी जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केलीय. ठाकरे बंधूंनी मोर्चे काढून निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी संस्थेची भूमिका समजून घ्यावी, असा टोला त्यांनी लगावला. (Top 10 News)
७) RNO : खरीप पिकांनंतर आता ऊसही संकटात! कमी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली
हदगाव तालुक्यातील शेतकरी पारंपरिक खरीप पिकांपेक्षा वार्षिक पिकांकडे वळताना दिसत आहेत. सोयाबीन आणि कापूस पिकांचा वाढता उत्पादन खर्च, हवामानातील अनिश्चितता आणि अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकरी ऊस पिकाला प्राधान्य देत आहेत. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ऊस पिकावरही संकट निर्माण झाले आहे. अनेक भागांत पाण्याची उपलब्धता कमी असल्याने उसाच्या वाढीवर परिणाम होत असून उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होतेय. सिंचनाची पुरेशी सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी कमी पाऊस मोठी अडचण ठरत आहे. खरीप पिकांप्रमाणेच वार्षिक पिकांवरही संकट आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक चिंता वाढली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि पाणी व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होतेय. (Top 10 News)
८) RNO : महिनाभरापासून CSC सेंटर बंद; शेतकऱ्यांची गैरसोय, केंद्रे पुन्हा सुरू करण्याची मागणी
वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये मागील महिनाभरापासून बंद असलेली CSC सेंटर पुन्हा सुरू करण्याची मागणी आमदार राजेश बकाने यांनी केलीय. CSC सेंटर चालकांनी आमदार बकाने यांची भेट घेऊन केंद्र बंद असल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी मांडल्या. फार्मर आयडी, दुष्काळी मदत, पीककर्ज आणि कर्जमाफीसह शेतकऱ्यांशी संबंधित विविध प्रक्रिया या केंद्रांमार्फत केल्या जातात. मात्र, केंद्रे बंद असल्याने शेतकऱ्यांना या प्रक्रियांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. या प्रश्नासंदर्भात आमदार राजेश बकाने यांनी पालकमंत्री पंकज भोयर आणि जिल्हाधिकारी वानमथी श्री यांच्याशी चर्चा केली. बंद CSC सेंटरची तपासणी करून पात्र आणि प्रत्यक्ष कार्यरत केंद्रांना न्याय द्यावा, तसेच केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Top 10 News)
९) RNO : एपीएमसी बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली; मागणी घटल्याने दर घसरले
नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात घसरण झालीय. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात भाजीपाल्याला अपेक्षित मागणी मिळत नसल्याने दर कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. एकीकडे बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे, तर दुसरीकडे मागणी कमी असल्याने त्याचा परिणाम शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर होत आहे. विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे दर मागील काही दिवसांच्या तुलनेत घसरले आहेत. आवक आणि मागणीतील या तफावतीमुळे बाजारातील दरांवर दबाव निर्माण झाला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत भाजीपाल्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केलीय. (Top 10 News)
१०) दिल्लीचे मंत्री प्रवेश वर्मांना तरुणानं प्रश्न विचारताच कानशिलात लगावली, ‘आप’ने व्हिडिओ पोस्ट केला
दिल्ली सरकारमधील भाजप मंत्री प्रवेश वर्मा यांचा एका तरुणाला थप्पड मारतानाचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दिल्लीतील रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न विचारताना तरुण व्हिडिओ रेकॉर्ड करत होता, याचवेळी प्रवेश वर्मा यांनी तरुणाला थप्पड मारल्याचा आरोप AAPने केलाय. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आम आदमी पक्षाने मंत्री वर्मा यांच्यावर टीका केली. AAPचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे या घटनेवर प्रतिक्रिया देत वर्मा यांच्यावर आरोप केलेत. (Top 10 News)
११) UNSC मध्ये भारताला स्थायी सदस्यत्वासाठी मोठा पाठिंबा; रशियासोबत मॉरिशस, पोर्तुगालही भारताच्या बाजूने
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, या मागणीला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा मिळाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या महासभेदरम्यान रशियाने भारताच्या स्थायी सदस्यत्वाच्या दाव्याला पाठिंबा दिला. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी सुरक्षा परिषदेत आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेचे प्रतिनिधित्व वाढवण्याची भूमिका मांडली. त्याचबरोबर मॉरिशस आणि पोर्तुगालनेही भारताच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दर्शवला आहे. मॉरिशसने G4 आणि L69च्या सुधारणांच्या भूमिकेला समर्थन देत भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय. पोर्तुगालनेही अधिक प्रतिनिधिक सुरक्षा परिषदेची गरज व्यक्त केलीय. सध्या UNSCमध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका हे पाच स्थायी सदस्य असून त्यांच्याकडे व्हेटो अधिकार आहेत. मात्र भारताला स्थायी सदस्य बनवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमध्ये बदल आणि आवश्यक आंतरराष्ट्रीय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. (Top 10 News)
१२) मोबाईल रिचार्जच्या नियमांत मोठा बदल; डेटा नको असेल तर मिळणार स्वस्त Voice-SMS पॅक
मोबाईल रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. TRAIने Telecom Consumer Protectionच्या १३व्या दुरुस्तीचे नियम जारी केलेत. नव्या नियमांनुसार, टेलिकॉम कंपन्यांना ३० दिवस किंवा त्यापेक्षा कमी वैधतेच्या संबंधित प्लॅनसोबत केवळ Voice आणि SMS सुविधा देणारे स्वतंत्र Special Tariff Vouchers उपलब्ध करून द्यावे लागतील. अशा पॅकमध्ये योग्य दरकपातीची तरतूदही करण्यात आलीय. तसेच दर महिन्याला त्याच तारखेला रिन्यू करता येईल, असा पर्याय उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. त्यामुळे ज्यांना मोबाईल डेटाची गरज नाही, त्यांना केवळ कॉलिंग आणि SMSसाठी स्वतंत्र रिचार्ज पर्याय मिळणार आहे. TRAIच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार रिचार्ज निवडण्याचे अधिक पर्याय मिळतील. हे नियम राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांनी लागू होतील. (Top 10 News)
१३) दिवाळीआधी सर्वसामान्यांना मोठा धक्का! AC, TV, फ्रिज महागणार
दसरा-दिवाळीच्या तोंडावर एसी, टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशीन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबरपासून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमती वाढण्याची शक्यता असून, काही उत्पादनांमध्ये ५ ते ८ टक्क्यांपर्यंत दरवाढ होऊ शकते. एसीच्या किमती ५ ते ८ टक्क्यांनी, तर काही कंपन्यांकडून फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एलईडी टीव्हीच्या किमती ३ ते ४ टक्क्यांनी वाढवण्याची तयारी असल्याचे PTIच्या वृत्तात म्हटलेय. कॉपर, स्टील, अॅल्युमिनियम आणि क्रूडशी संबंधित कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, वाहतूक खर्च आणि चलनातील चढ-उतार यामुळे कंपन्यांवर खर्चाचा दबाव वाढला आहे. ब्लू स्टार, गोदरेज, हायर, डायकिन आणि सुपर प्लास्ट्रॉनिक्ससारख्या कंपन्यांनी दरवाढीची घोषणा केलीय. (Top 10 News)
१४) बिग बॉस फेम दिव्या शिंदेला अटक
‘बिग बॉस मराठी’ फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदेला पुण्यातील काळेपडळ पोलिसांनी अटक केलीय. निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या तक्रारीवरून दिव्या शिंदेसह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारीनुसार, ‘कला आविष्कार महोत्सवा’च्या प्रसिद्धीचा मोबदला मागण्याच्या कारणावरून पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्याने दिव्या शिंदे आणि तिच्या साथीदारांनी डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत डॉक्टर जखमी झाल्याने त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. पोलिसांनी या प्रकरणात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासले जात असल्याचे समोर आलेय. (Top 10 News)
१५) विराट कोहलीचा ऐतिहासिक पराक्रम; अझरुद्दीनचा २८ वर्षे जुना विक्रम मोडला!
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिरुवनंतपुरम येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरताच विराट कोहलीने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा २८ वर्षे जुना विक्रम मोडलाय. कोहलीचा विंडीजविरुद्धचा हा ४४ वा एकदिवसीय सामना ठरला असून, तो आता या संघाविरुद्ध भारताकडून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारा अव्वल खेळाडू बनलाय. अझरुद्दीन यांनी विंडीजविरुद्ध ४३ सामने खेळले होते. या यादीत कपिल देव (४२ सामने) तिसऱ्या, तर राहुल द्रविड (४० सामने) चौथ्या स्थानावर आहेत. सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांनी प्रत्येकी ३९ सामने खेळले आहेत. दरम्यान, कोहलीला १५ हजार एकदिवसीय धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी आता अवघ्या ५९ धावांची गरज आहे. (Top 10 News)





